MLA Rohit Pawar | बारामतीत ‘पवार’ विरूद्ध ‘पवार’ नाही, तर एकजूट! सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी रोहित पवारांची ‘भावनिक’ पोस्ट
पुणे : MLA Rohit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, ही निवडणूक आता केवळ एक राजकीय लढत राहिलेली नाही; तर तिला एक भावनिक पैलू प्राप्त झाला आहे. या घडामोडींच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांचे हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवत, रोहित पवार यांनी बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार म्हणाले, “बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो, तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल”
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, आता निवडणूक होत असल्याने, “तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन समर्थकांकडून केले जात आहे.
