Pune Crime News | विद्या प्रतिष्ठानच्या नांदेड सिटी पब्लिक स्कुलला क्लार्कने घातला 37 लाखांचा गंडा; बनावट रेकॉर्ड तयार करुन इंटरनेट बँकिंगद्वारे पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केले पैसे
पुणे : Pune Crime News | विद्या प्रतिष्ठान या शरद पवार कुटुंबियांच्या नामवंत संस्थेतील नांदेड सिटी पब्लिक स्कुलमध्ये काम करणार्या क्लार्कने इंटरनेट बँकिंगद्वारे परस्पर संस्थेतील ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपये पत्नीच्या नावावर ट्रान्सफर करुन पवार पब्लिक स्कुलला गंडा घातला आहे.
याबाबत प्राचार्या वंदना सचिन जोशी (वय ५५, रा. चंद्रागण सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेंद्र अनपट आणि अश्विनी अनपट ऊर्फ अश्विनी तरटे (रा. युतिका एन्क्लेव्ह, कोल्हेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नांदेडसिटीमधील पवार पब्लिक स्कुल येथे ५ नोव्हेबर २०२४ ते ३ जून २०२५ दरम्यान घडला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कुलच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून खजिनदार युगेंद्र श्रीनिवास पवार आहेत. खासदार सुप्रिया सदानंद सुळे या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.
या संस्थेत राजेंद्र अनपट हे क्लार्क म्हणून कामाला आहेत. त्यांनी संस्थेच्या संमतीशिवाय इंटरनेट बँकिंगद्वारे फिर्यादी व संस्थेच्या संमतीशिवाय परस्पर रक्कम पत्नी अश्विनी अनपट हिच्या नावे ट्रान्सफर केल्या. संस्थेच्या अभिलेखात खोटे रेकॉर्ड तयार करुन संस्थेचा विश्वासघात केला. ३६ लाख ९९ हजार ९८८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. संस्थेच्या लेखा परिक्षणात ही बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे.
नांदेड सिटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र अनपट याला चौकशीसाठी बोलविले आहे, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसे यांनी सांगितले.
