Pune Crime News | निवृत्त पोलीस कर्मचार्‍याच्या आत्ये बहिणीनेच केली फसवणूक; पैसे मागितल्यावर पोलिसालाच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी, आत्ये बहिणीसह चौघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मिळालेले पैसे बांधकाम व्यवसायात गुंतविण्यास सांगून निवृत्त पोलीस कर्मचार्‍याची त्याच्या आत्ये बहिणीनेच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पैसे मागितल्यावर तुमच्याविरुद्ध  खंडणीचे तक्रारी अर्ज करुन गुन्ह्यात अडकवू, पेन्शनही खाऊ देणार नाही, अशी धमकी दिली आहे.

याबाबत एका ४८ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आसमा नईम सय्यद (रा. रोशन मस्जिदसमोर, भवानी पेठ), फरिदा युसुफ खान (रा. वानवडी गाव), आसमा युसुफ खान, तौसिफ नईमुद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२० ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती पोलीस दलातून नोव्हेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले. फिर्यादी या क्लास घेत असून पतीचे पेन्शन आणि क्लासमधून मिळणार्‍या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ते भवानी पेठेतील रोशन मस्जिदसमोरील एम एस आर रजिन्सी येथे रहायला आहेत. त्यांच्या वरच्या मजल्यावर आत्ये बहिणी आसमा नईम सय्यद ही राहते. फिर्यादी यांची मुलगी अलिशा हिचे लग्न सैफ पठाण यांच्याशी झाले असून तेही पोलीस दलात कार्यरत आहेत. ते भवानी पेठ पोलीस वसाहत येथे राहतात. मुलगी गरोदर असल्याने तिची काळजी घेण्यासाठी २०२० मध्ये त्यांना पोलीस वसाहतीत राहण्यासाठी बोलावले. त्यामुळे त्यांनी आपला फ्लॅट १८ लाख डिपॉझिट घेऊन भाड्याने दिला होता. हे आसमा सय्यद हिला समजल्यावर तिने त्यांची फरिदा युसुफ खान हिची ओळख करुन दिली. तुम्हाला मिळालेले डिपॉझिटचे पैसे आमच्या कस्ट्रक्शनमध्ये गुंतवा. तुम्हाला बँकेपेक्षा डबल व्याजदर देऊ असे सांगितले. बहिण असल्याने तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी १५ लाख रुपये तिच्याकडे गुंतविले. तसेच त्यांच्या जावयाने ३ लाख रुपये गुंतविले. तिला दिलेल्या धनादेशावर तिने अनोळखी लोकांची नावे टाकून ते चेक वटविले. त्याबाबत विचारल्यावर ती माझीच माणसे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे वेळेवर मोबदल्यासह पैसे मिळून जातील, असे सांगून त्यांना गप्प केले. २०२१ मध्ये आसमा नईम सय्यद आणि फरीदा युसुफ खान यांच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल होऊन त्यात अटक करण्यात आली होती.  काही दिवसांनी त्यांची सुटका झाली. २०२२ मध्ये त्यांनी पैशांबाबत विचारल्यावर माझ्यामागे कोर्ट कचेरी लागली आहे. तुम्ही काय मला पैसे मागू नका, असे सांगून तिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, ते रहात असलेल्या भवानी पेठेतील घराला तडे गेल्याने पोलिसांनी हे घरे खाली करायला लावली. त्यामुळे त्यांनी भाडेकरुला त्याचे डिपॉझिट परत करण्यासाठी आसमा सय्यदकडे पैसे  मागितले. तेव्हा तिने वेगवेगळी कारणे सांगितले. दरम्यान २०२३ मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध कटकारस्थान, खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे पैशांची विचारणा केली. तेव्हा तिने मला पैश्यांची मागणी केली तर मी माझे जीवाचे बरेवाईट करुन घेऊन मला तुम्ही खंडणी मागत आहात, अशी तुमच्या नावाने खोटी तक्रार करेन, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी भितीपोटी पैसे मागितले नाही. फरिदा खान ही वानवडी परिसरात रहात असून तिचे अवैध दारुचे, हातभट्टीचा विक्री व्यवसाय आहे. तिच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळले.

शेवटी त्यांनी बँकेतून कर्ज काढून भाडेकरुचे डिपॉझिटचे पैसे देऊन आपल्या घरी रहायला गेले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचे ठरविल्यावर तिने २५ हजार रुपये दिले. परंतु, त्यानंतर पुढे एकही पैसा दिला नाही. शेवटी त्यांनी आता पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याची दखल घेऊन समर्थ पोलिसांनी आसमा सय्यदसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.

You may have missed