Bapu Pathare MLA | उद्यानांच्या विकासाला गती; आमदार बापूसाहेब पठारे यांचा पाहणी दौरा
पुणे : Bapu Pathare MLA | खराडी व परिसरातील उद्यानांच्या विकासासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक अशोक घोरपडे, उपअभियंता चंद्रकांत गवळी, निखिल रणदिवे, संग्राम कनमहाले, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
खराडी सर्व्हे नं. ३, निर्मला कॉन्व्हेंट शाळा, सातव वस्ती येथील जागेची पाहणी करत गार्डन विकसित करण्यासाठी प्रथम सीमा भिंत उभारणे, टाकलेला राडारोडा हटवणे तसेच प्लॉट दोन टप्प्यांत भराव करून गार्डनसाठी योग्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व्हे नं. १७ व १८, न्याती इलेशिया सोसायटी शेजारील गार्डन आरक्षणाच्या जागेवर सीमा भिंत बांधणे व संपूर्ण जागेचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
सोमनाथ नगर येथील गार्डनची पाहणी करत अधिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यास सांगितले. तसेच स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याच्या तक्रारीची दखल घेत तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना पठारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “परिसरातील नागरिकांना दर्जेदार, स्वच्छ आणि सुरक्षित उद्याने उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता आहे. उद्यानांची उभारणी आणि देखभाल नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनशैलीशी निगडित बाब आहे. त्यामुळे प्रलंबित कामांना गती देत सर्व उद्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.” परिसरातील उद्यानांचा विकास व देखभाल अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
