Pune Crime News | प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या 6 वर्षाच्या मुलाचा आई, प्रियकराने केला खुन; सासर्‍यांमुळे आले प्रकरण उघडकीस, दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आईला केली अटक, प्रियकर फरार

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंधात अडथळा ठरणार्‍या ६ वर्षाच्या मुलाला आईने व तिच्या प्रियकराने पाण्याच्या बादलीत डोके बुडवले.  तो बेशुद्ध झाल्यावर बाथरूम च्या भिंतीवर व जमिनीवर आपटून त्याचा खुन केला. त्यानंतर त्याला घेऊन ते बीडमधील गावी गेले. तेथे मुलाला हृदयविकाराचा  झटका येऊन मुलाचा मृत्यु झाल्याचे सांगितले. सासर्‍यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कळविले. त्यातून खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आईला अटक केली आहे.

बसरीन मेहबुब शेख (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड, मुळ माहेरचे गाव धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड, सासरचे गाव पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्या आईचे नाव आहे. आवेज मेहबुब शेख (वय ६) असे मृत मुलाचे नाव आहे. तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, ता. खेड, मुळ रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत इसाक महमंद शेख (वय ४९, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कुरुळी गावात बसरीन हिच्या घरी ४ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसरीन शेख ही सध्या कुरुळी येथील एका कंपनीत कामाला आहे. तिचा प्रियकर राम कजेवाड हा कॅबचालक म्हणून पुण्यात काम करतो. बसरीन शेख हिचे मेहबुब शेख याच्याबरोबर लग्न झाले आहे. त्यांना आवेज हा ६ वर्षाचा मुलगा होता. मेहबुब शेख हा मोलमजुरी करतो. त्यांच्या गावातील राम कजेवाड याच्याबरोबर बसरीन हिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून  बसरीन शेख मुलाला घेऊन ४ महिन्यांपूर्वी राम कजेवाड याच्याबरोबर पुण्यात आली. एका कंपनीत काम करु लागली. त्या दोघांमध्ये आवेज याचा अडथळा होत होता. त्यामुळे त्यांनी ४ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाथरुमधील पाण्याच्या बाटलीत आवेज याचे डोके बुडवून दाबुन धरले.

तो बेशुद्ध झाल्यावर बाथरुमचे भिंतीवर व जमिनीवर डोके आपटून ठार केले. त्यानंतर दोघेही आवेज याचा मृतदेह घेऊन बसरीन हिच्या माहेरी  धर्मापुरी येथे आले. त्यांनी आवेज याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यांनी ही बाब तिच्या सासरी पुस येथे इसाक शेख यांना कळविली. त्यांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक परळी ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलिसांनी आवेज याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठविला. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यु जखमांमुळे झाल्याचा अहवाल दिला. त्यावरुन पोलिसांनी चौकशी केल्यावर आम्ही त्याला मारल्याची हकीकत बसरीन हिने पोलिसांना दिली. हा प्रकार पुण्यात घडल्याने त्यांनी हा गुन्हा पुण्यात वर्ग केला. पोलीस उपनिरीक्षक जायभाये तपास करीत आहेत.