Pune Crime News | सुपारी घेऊन खुन करणार्‍या सराईत गुन्हेगाराला साथीदारासह अटक करुन पुणे ग्रामीण पोलिसांनी ३ खुनाचे गुन्हे आणले उघडकीस, पैसे मागत असल्याने प्रेयसी व तिच्या मुलाचाही केला खुन

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून खुनाची सुपारी घेऊन गावकर्‍याचा खुन करणार्‍या सराईत गुन्हेगाराला साथीदारासह खेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्याच्या चौकशीत प्रेयसी व तिच्या तरुण मुलाचाही खुन ३५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराने केल्याचे उघडकीस आले आहे.

ललित दीपक खोल्लम Lalit Deepak Khollam (वय ३८, रा. शिरोली, शिंदेवस्ती, ता. खेड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. नंदलाल दिलीप होले Nandlal Dilip Hole (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) आणि निलेश कैलास सणस Nilesh Kailash Sanas (वय ३४, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्या खोल्लमच्या साथीदारांची नावे आहेत. धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी, ता. खेड, मुळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव) याचा मृतदेह खेड तालुक्यातील जेदवाडी येथील मोकळ्या जागेत १८ मार्च रोजी आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर व तोंडावर हत्याराने मारुन त्यांचा खुन करण्यात आला होता. ग्रामीण भाग असल्याने परिसरात सीसीटीव्हीचा अभाव होता. घटनास्थळापासून मुख्य रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात सराईत गुन्हेगार ललित खोल्लम व त्याचा साथीदार मुख्य रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये आढळून आले.

फुटेजमधील दुसर्‍या साथीदाराचे नाव नंदलाल होले असल्याचे निष्पन्न झाले. तो देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. दोघेही सराईत गुन्हेगार घटनास्थळाच्या परिसरात आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. या फुटेजच्या आधारे पोलिसंनी खेड ते वडगाव निंबाळकर असे सुमारे १४५ किमीपर्यंत सलग ६ दिवस सुमारे ११० कॅमेर्‍याचा मागोवा घेण्यात आला. दोन्ही गुन्हेगार वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदारांकडून मिळाली. २५ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, खेड पोलीस पथक व वडगाव निंबाळकर पोलिसांचे पथक यांनी वडगाव निंबाळकर परिसरात सापळा लावला. आजूबाजूला ऊसाची शेतींना घेराव घालण्यात आला. संशयितांना पोलिसांची चाहुल लागल्याने दोन्ही गुन्हेगारांनी ऊसाच्या शेतातून पळ काढून नदीच्या दिशेने पळाले. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन आरोपींनी नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतले.

ललित खोल्लम आणि नंदलाल होले यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्यांची मालिकाच सांगितली. धनंजय घेवडे आणि नंदलाल होले हे एकाच गावात सध्या राहतात. नंदलाल होले आणि धनंजय होले यांच्यात भांडणे झाले होते. तसेच त्याच गावातील निलेश सणस याचेसोबत देखील धनंजय घेवडे याचा वाद होता. त्या वादाचे कारणावरुन ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी मिळून संगनमताने धनंजय घेवडे याच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारुन खुन केल्याची कबुली दिली. त्यासाठी निलेश सणस याने गुन्हा करण्यासाठी पैसे पुरविल्याची माहिती मिळाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.

धनंजय घेवडे याचा खुन करण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड व दगड जप्त केला असून गुन्हा करताना आरोपीचे अंगावर असलेले कपडे त्यांनी जाळून टाकले. धनंजय घेवडे याचा मोबाईल फोन त्यांनी वाफगावाजवळील विहीरीत टाकून दिला होता, तोही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ललित खोल्लम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विरोधात यापूर्वी २ खुन, १ खुनाचा प्रयत्न, १० जबरी चोरी, २० घरफोडी व चोरीचे गुन्हे असे एकूण ३५ गुन्हे सातारा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत दाखल आहेत. आरोपींनी जबरी चोरी करताना गावठी पिस्तुलाचा वापर केले आहे. नंदलाल होले याच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. दोघांवर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सध्या जामीनावर बाहेर आहेत.
प्रेयसी, तिच्या तरुण मुलाचा केला खुन

ललित खोल्लम याचे रुपाली विलास वाडेकर ( वय ४६, रा. शिरोली, ता. खेड) हिच्या सोबत प्रेमसंबंध होते. त्या कारणावरुन ती नेहमीच त्याच्याकडे पैसे मागत होती. पैसे मागण्याच्या कारणावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. तिचा मुलगा श्रीकांत वाडेकर हा देखील ललित खोल्लमकडे पैशांची मागणी करत होता. या गोष्टींचा राग ललित याच्या डोक्यात होता. रुपाली व श्रीकांत वाडेकर हे ठाण्यात असताना ७ डिसेंबर २०२५ रोजी पैसे देतो, अशी फुस लावून त्याने श्रीकांत विलास वाडेकर (वय २६, मुळ रा. शिरोली, ता. खेड) याला खेड येथे बोलावून घेतले. शिरोली येथील फ्लॅटवर नेऊन डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा खुन केला.  त्याचा मृतदेह मंचर परिसरात नेऊन जाळून टाकला व मृतदेहाची विल्हेवाट लावली. मयताची राख गोळा करुन घोडनदी पात्रात सोडून दिल्याचे निष्पन्न झाले. ठाणे शहरातील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात खुनाचे कलम वाढ करण्यात आली.

श्रीकांत वाडेकर याची आई रुपाली वाडेकर ही ललित खोल्लम याला माझा मुलगा श्रीकांत कोठे आहे, असे वारंवार विचारत होती. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली होती. ललित याने तिला ठाणे येथून शिरोली येथे बोलावून  घेतले. १३ नोव्हेबर २०२५ रोजी तिला शिरोली येथील फ्लॅटवर घेऊन गेला.  तेथे तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन तोंडावर व गळ्यावर चाकूने वार करुन तिचाही खुन केला. ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी रुपाली  वाडेकर हिचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना खेड पोलीस ठाण्यातील खुन प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे केलेल्या सखोल कौशल्यपूर्ण तपासात खेड तालुक्यातील २ खुन आणि ठाणे शहरात दाखल १ खुन असे ३ खुनाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ललित खोल्लम याने या कालावधीत मध्य प्रदेश येथून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे आणून विक्री केली होती. पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत केली आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, सुदर्शन राठोड, बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, कुलदीप संकपाळ, नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीन, अतुल डेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, विनोद भोकरे, मंगेश थिगळे,

भाऊसाहेब पुंड, अजय देडे, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, राहुल पवार, रणजित कोंडके, खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, महेश गरड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शंकर भवारी, पोलीस अंमलदार जिजाबापू बिडकर, सुदर्शन मातडे, महेश गोसावी, स्वप्निल लोहार, गोकुळ कोळी, संकेत कवडे, प्रविण आढारी, ऋषिकेश गोपतवाड, वैशाली कांबळे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोपट नाळे, ह्दयनाथ देवकर यांनी केली आहे़

You may have missed