Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून 17 वर्षाच्या युवकावर टोळक्याने कोयत्याने डोक्यात, हातावर, पाठीवर, पायावर सपासप वार करुन केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | तू माझ्याबद्दल अफवा पसरवतो का? असे विचारल्यावरुन झालेल्या पूर्वीच्या भांडणातून टोळक्याने एका १७ वर्षाच्या मुलावर कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली असून ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेत कार्तिक संभाजी लवांडे (वय १७, रा. मुंजाबा वस्ती) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या फिर्यादीवरुन विश्रांतवाडी पोलिसांनी सुरज मार्शल चौरु Suraj Marshal Chauru (वय १९, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना विश्रांतवाडीतील भीमनगर येथे ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कार्तिक लवांडे हा शिक्षण घेत आहे. तो व त्याचे मित्र फटाके वाजवून मोटारसायकलवरुन मुंजाबा वस्ती येथे आले. तेथील बसस्टॉपवर प्रणव हा थांबलेला होता. तो कार्तिक याला म्हणाला की, तु येथे का आला आहे. त्यावेळी कार्तिक त्याला म्हणाला, तू मला मारायच्या अफवा का पसरवत आहे. तुझे आणि माझे काही देणे घेणे नाही, तेव्हा प्रणव म्हणाला, तुझे हे प्रत्येक वेळी नाटक आहे. तू माझा मित्राला मारले आहे, असे म्हणून प्रणव याने त्याच्या मित्रांना बोलवून घेतले. त्यांनी प्रणव याने तुला जास्त मस्ती आली आहे. तुला सांगुन समजावुन देखील तू माझे ऐकत नाही़ तुला आज आम्ही जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्याने इतरांना पकड याला हा आज जिवंत घरी जाता कामा नये, असे म्हणून सर्वांनी कार्तिक याला मारहाण करायला सुरुवात केली. प्रणव सुरज यांनी त्यांच्याकडील हत्यारांनी कार्तिक याच्या डोक्यावर, डोळ्याचे वर, पायावर सपासप वार केले. इतरांनी बॉटम पट्टीने मारहाण केली. त्यात कार्तिक हा चक्कर येऊन पडला. तेव्हा हल्लेखोर पळून गेले. त्याच्या मित्रांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लोहकरे तपास करीत आहेत.
