Pune Crime News | दारु पिण्याच्या कारणावरुन मजुराच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन; केटरिंग कामगाराला कोंढवा पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | दारु पित असताना झालेल्या वादातून केटरिंगचे काम करणार्या कामगाराने मोलमजुरी करणार्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घुण खुन केला.
मनिषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंचशिलनगर, कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. महादेव अर्जुन कांबळे Mahadev Arjun Kamble (वय ३५, रा. स्वामी समर्थनगर, कात्रज कोंढवा रोड) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढव्यातील आर के कॉलनी येथील टेकडीच्या कडेला असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली ३० एप्रिल रोजी रात्री ७ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव कांबळे हा केटरिंगचे काम करतो. मनिष कुमार पासवान हा मिळेल तेथे मोलमजुरी करतो. मनिषकुमार पासवान हा आर के कॉलनी येथील टेकडीच्या कडेला कडुलिंबाच्या झाडाखाली एकटा दारु पित बसला होता. त्यावेळी महादेव कांबळे तेथे गेला. त्याने दारु पिण्यास मागितली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा कांबळे याने तेथील दगड उचलून पासवान याच्या डोक्यात घालून त्याचा खुन केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. त्याने आपल्या भावाला याची आपल्या हातून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी शोध घेऊन महादेव कांबळे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक दीपक कारंडे तपास करीत आहेत़
