Pune Police News | विना परवानगी गैरहजर राहणार्या पोलीस अंमलदाराला केले निलंबित ! दीर्घ कालीन गैरहजर असलेल्या पोलीस अधिकार्यांची पोलीस आयुक्तांनी मागविली माहिती
पुणे : Pune Police News | पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारे सुचित न करता विना परवानगी अनेक दिवस गैरहजर असलेल्या पोलीस अंमलदाराला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित केले आहे. तसेच पुणे शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक हे ९० दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्ण निवेदनावर आहेत अथवा विना परवाना गैरहजर आहेत, अशांची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे, विभागांकडून मागविली आहे.
योगेश संपत साळवी (Yogesh Sampat Salvi) असे निलंबित केलेल्या पोलीस अंमलदारांचे नाव आहे. त्यांची बंडगार्डन पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. ते १२ मार्च २०२६ पासून आजतागयात कर्तव्यावर विना परवाना गैरहजर आहेत. त्यांनी गैरहजेरीबाबत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारे सुचित केलेले नाही अगर गैरहजेरीचे पुष्टार्थ कोणतीही वैध कागदपत्रे देखील सादर केलेली नाहीत. शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून सतत विना परवाना गैरहजर राहण्याची सवय असल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांना शासकीय कर्तव्याप्रती कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उपोषण, व्हीआयपी बंदोबस्त, इतर महत्वाचे बंदोबस्त असतात. त्यामुळे क्राईम मिटींग, पोलीस ठाणे भेटीदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गैरहजर असलेल्या पोलीस अंमलदारांना वारंवार कर्तव्यावर हजर राहणार्याच्या तोंडी सुचना दिल्या आहेत. असे असताना विना परवाना गैरहजर राहिल्याने शिस्तभंगविषयक कार्यवाही म्हणून त्यांना निलंबित केले आहे.
