Paydhuni News | कलिंगड निमित्त मात्र, पण काळ ठरलं उंदराचं औषध! डोकाडिया कुटुंबातील मृत्यूकांडाचे धक्कादायक सत्य समोर
मुंबई : Paydhuni News | दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरले होते. सुरुवातीला या मृत्यूचे कारण ‘विषारी कलिंगड’ असल्याचे संशय व्यक्त केला जात होता, मात्र कलिना फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाने या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आणले आहे. या कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नाही, तर उंदीर मारण्यासाठी घरात वापरलेल्या ‘झिंक फॉस्फाईड’ या अत्यंत घातक रसायनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, डोकाडिया कुटुंबाने घरात उंदरांचा सुगावा लागल्याने हे विषारी औषध टाकले होते. झिंक फॉस्फाईड हे असे रसायन आहे, जे हवेतील ओलाव्याशी किंवा पाण्याशी संपर्कात आले की त्यातून ‘फॉस्फिन’ नावाचा अत्यंत विषारी वायू बाहेर पडतो. दुर्दैवाने, ज्या रात्री ही घटना घडली, त्याच रात्री कुटुंबाने कलिंगड कापून खाल्ले होते. कलिंगडातील पाणी आणि घरातील आर्द्रता यामुळे या विषारी वायूची निर्मिती झाली आणि तो श्वसनावाटे सदस्यांच्या शरीरात गेला. या ‘सायलेंट किलर’ वायूने थेट फुफ्फुसे आणि हृदयावर हल्ला केल्याने कुटुंबातील सदस्यांना तीव्र विषबाधा होऊन त्यांचा जीव गेला.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, हा वायू इतका प्रभावी असतो की बंद खोलीत त्याचे परिणाम काही तासांतच जीवघेणे ठरू शकतात. या घटनेने घरगुती कीटकनाशकांच्या वापराबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. अनेकदा आपण उंदीर किंवा झुरळ मारण्यासाठी बाजारातून तीव्र स्वरूपाची औषधे आणतो, पण ती वापरताना योग्य खबरदारी घेत नाही. अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे किंवा औषध लावल्यानंतर हात स्वच्छ न धुणे अशा छोट्या चुका जीवावर बेतू शकतात. पायधुनीच्या या घटनेने संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने अशा घातक रसायनांच्या विक्रीबाबत आणि वापराबाबत कडक नियमावली करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
२६ एप्रिल रोजीची घटना
दरम्यान, मुंबईत २६ एप्रिल रोजी अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ले होते, कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. २६ तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता.
