Nashik TCS Case Nida Khan | नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: मुख्य आरोपी निदा खानला अखेर बेड्या; दोन दिवसांच्या पाळतीनंतर संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई

Nashik TCS Case Nida Khan | Nashik TCS conversion case: Main accused Nida Khan finally in handcuffs; Major action in Sambhajinagar after two days of surveillance

छत्रपती संभाजीनगर : Nashik TCS Case Nida Khan | नाशिकच्या टीसीएस (TCS) बीपीओ युनिटमध्ये गाजलेल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसली असल्याची खात्रीलायक माहिती नाशिक एसआयटीला (SIT) मिळाली होती. त्यानुसार संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीमध्ये गुरुवारी धाड टाकून ही मोठी कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान या परिसरात आपल्या कुटुंबासह एका फ्लॅटमध्ये नाव बदलून राहत होती. नाशिक पोलिसांनी तिच्यावर गेल्या दोन दिवसांपासून साध्या वेशात पाळत ठेवली होती आणि योग्य संधी मिळताच तिला ताब्यात घेतले. अटकेनंतर तिला संभाजीनगर न्यायालयात हजर करून तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला असून, आता तिला पुढील चौकशीसाठी नाशिकला आणण्यात आले आहे.

निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. ती टीसीएसमध्ये ‘एचआर मॅनेजर’ असताना महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींकडे तिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. इतकेच नाही, तर पीडित महिलांचे ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि विशिष्ट धर्माच्या तरुणांशी मैत्री करण्यासाठी दबाव टाकणे, यामध्ये तिचा मुख्य सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी तिने गरोदर असल्याचे कारण सांगून न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. निदाच्या अटकेमुळे आता या संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत आणि तिला कोणाचे पाठबळ होते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

You may have missed