Pune Crime Court News | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे यांना जिल्हा न्यायालया कडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे : Pune Crime Court News | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे यांना जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
वारकरी समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विकास सदाशिव लवांडे (वय ५४) यांच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९६(१) (अ), २९९ व ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्यामध्ये अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन विकास सदाशिव लावंडे यांनी येथे फौजदारी अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर बुधवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सुनावणी घेतली. अर्जदाराच्या वतीने अॅड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी बाजू मांडताना संबंधित प्रकरण हे खोटे व प्रतिशोधाच्या हेतूने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच अर्जदार विकास लवांडे यांनी यापूर्वी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात त्यांना पिस्तूल रोखून धमकावल्याची व अंगावर केमिकल युक्त ऑईलसदृश वंगण टाकण्यात आल्याची तक्रार दिली आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी किरकोळ व जामीनपात्र स्वरूपाची कलमे लावल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला.
अॅड. हर्षवर्धन पवार यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने विकास सदाशिव लवांडे यांना दिनांक २० मे २०२६ पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जिल्हा न्यायालयाने आदेशामध्ये संबंधित पोलीसांना नोटीस बजावून अंतरिम संरक्षण पुढे का सुरू ठेवू नये याबाबत त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्य अर्जावर सरकार पक्ष व तपास अधिकाºयांचे म्हणणे मागविण्यात आले आहे. न्यायालयाने अर्जदारास तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर अंतरिम संरक्षण दिले असून पुढील सुनावणी दिनांक २० मे २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.
विकास सदाशिव लवांडे यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले असून ते कायदेशीर प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
