Pune ACB Trap Case | फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला अटक न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर आणखी 50 हजारांची मागणी करणाऱ्या महिला सहायक पोलीस निरीक्षकास ACB ने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या पत्नीला अटक न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेतल्यानंतर आणखी ५० हजार रुपयांची मागणी केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
ज्योती पांडुरंग तांबे Jyoti Pandurang Tambe (वय ४१, रा. ड्रीम रिदम सोसायटी, पाटीलनगर, बावधन) असे या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.
तक्रारदार आणि त्याची पत्नी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात तक्रारदाराने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याला प्रतिवादी पक्षाने न्यायालयात स्वतंत्र वकील देऊन विरोध केला. त्यामुळे तक्रारदार याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला होता. ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी विरोध केल्याने तक्रारदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळल्यावर बावधन पोलिसांनी त्याला अटक केली होती. १४ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मिळाला होता. आपल्या प्रमाणे पत्नीला अटक होऊ नये, तिला अटक झाली तर त्यांच्या लहान मुलाची आबाळ होईल, यासाठी त्याने पोलिसांना विनंती केली होती. या गुन्ह्यामध्ये ज्योती तांबे यांच्याकडे तपास होता.
या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व पत्नीला अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ज्योती तांबे हिने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी ही लाच दिली. त्यानंतर आणखी ५० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी १२ मार्च २०२६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी १२ व १७ मार्च २०२६ रोजी करण्यात आली. त्यात ज्योती तांबे हिने तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी ५० हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित ५० हजार रुपयांच्या रक्कमेपैकी १० किंवा ५ हजार रुपये कमी करुन उर्वरित रक्कमेची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु, त्यावेळी तक्रारदार हे जरुरी पेक्षा अधिक बोलत असल्याने ज्योती तांबे हिला संशय आल्याने सापळा कारवाई होऊ शकली नव्हती. तरीही लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन ज्योती तांबे हिला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर तपास करीत आहेत.
