Yerawada Jail News | पुणे : येरवडा ओपन जेलमधून पुन्हा जन्मठेपेचा कैदी फरार; सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Yerawada Jail News | Pune: Another life-sentenced prisoner escapes from Yerawada Open Jail; Serious question mark on security

पुणे : Yerawada Jail News | येरवडा येथील खुल्या कारागृहातून आणखी एका जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरातील कारागृहातून कैदी फरार होण्याची ही दुसरी घटना असल्याने कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जनार्दन शंकर आडसुळे (रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे फरार कैद्याचे नाव असून, तो खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. या प्रकरणी येरवडा कारागृह प्रशासनाकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडसुळे याच्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे त्याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तो तेथे शेतीची कामे करत होता.

मंगळवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान त्याने कारागृहाच्या कायदेशीर रखवालीतून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत तो कारागृहात परत न आल्याने प्रशासनाने शोध सुरू करत येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, यापूर्वी ८ मे रोजी संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) या जन्मठेपेच्या कैद्याने देखील येरवडा कारागृहातून पलायन केले होते. तो अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. एक फरार कैदी अद्याप सापडलेला नसताना दुसऱ्या कैद्यानेही पळ काढल्याने कारागृह सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

You may have missed