Pune PMC News | शहर स्वच्छता आणि कचर्‍या व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर; सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेचे ऑडीट करण्याची जबाबदारी यापुढे ठेकेदारांवरच

naval kishor ram

प्रक्रिया प्रकल्पातील क्षमता वाढविणार !घनकचरा व्यवस्थापन आणि व्हेईकल डेपोचा कारभार एकाच अधिकार्‍याकडे देणार; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

पुणे : Pune PMC News | शहर स्वच्छता आणि अतिरिक्त कचरा व्यवस्थापनासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी झाडणकाम तपासणीची सर्व जबाबदारी ठेकेदारांवर सोपविण्यात आली असून ‘अस्वच्छतेबाबत’ तक्रारी आल्यास संबधित ठेकेदारांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे प्रकल्प कमी क्षमतेने चालत आहेत, त्या प्रकल्पांना क्षमता वाढविण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य प्रकल्पांनाही अतिरिक्त कचरा प्रक्रियेसाठी देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

सोमवारी सर्व साधारण सभेमध्ये सर्व पक्षीय नगरसेवकांनी शहरातील अस्वच्छता आणि साठलेल्या कचर्‍यावरून प्रशासनाला धारेवर धरले. केशवनगर येथील सुमारे १७५ टन क्षमतेचे दोन प्रकल्प बंद असल्याने तसेच सूस येथील नोबल कंपनीचा आणि रामटेकडी येथील मे. पूना बायो एनर्जी प्रकल्पही कमी क्षमतेने सुरू असल्याने शहरात सुमारे ३०० ते ३५० टन कचर्‍याचा प्रश्‍न निर्माण झाल्याची कबुली प्रशासनाने दिली होती. यावर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन देणार्‍या महापालिका आयुक्तांनी आज घनकचरा व्यवस्थापन तसेच प्रकल्प चालकांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, घन कचरा विभागाचे प्रमुख संतोष वारुळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी देखिल उपस्थित होते.


सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी प्रामुख्याने ठेकेदारांकडील मनुष्यबळाचा वापर होतो. या कर्मचार्‍यांची उपस्थिती आणि कामावर कोठी मोकादमाकडून लक्ष देण्यात येत होते. परंतू यानंतरही अस्वच्छतेबाबत तक्रारी येत होत्या. या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांच्या उपस्थितीपासून ज्या भागाच्या स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदाराकडे सोपविण्यात आली आहे, ती सर्व जबाबदारी ठेकेदाराकडे सोपविण्याचा निर्णय आज झाला. यानंतरही अस्वच्छतेबाबत तक्रारी आल्यास याला सर्वस्वी ठेकेदारालाच जबाबदार धरण्यात येणार आहे. मोकादमाने सकाळी साडेसात ते साडेनउ या वेळेत कोठीतच थांबायचे आणि यानंतर परिसराचे सर्वेक्षण करावे. दर पंधरा दिवसांनी या कामाचा अहवाल खात्यामार्फत आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले.


कचरा वाहतूकीसाठी वाहनांची कमतरता आहे. ही संख्या वाढविण्यात येईल. घनकचरा विभाग आणि व्हेईकल डिपार्टमेंटमधील असमन्वयामुळे काही अडचणी येत आहेत. लवकरच व्हेईकल डेपोची जबाबदारी घनकचरा विभागाकडेच देण्यात येईल. चिकन वेस्ट गोळा करण्यासाठी वेगळी सिस्टिम तयार करण्यात येईल. यासाठी नव्याने वाहने घेण्यात येतील तसेच प्रक्रिया प्रकल्पही सुरू करण्यात येईल., असेही आयुक्त राम यांनी नमूद केले.

कचरा प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणार

सूस येथील नोबल हा ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सध्या ४० टन क्षमतेने सुरू आहे. या प्रकल्पात १०० टन क्षमतेपर्यंतच्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येईल. रामटेकडी येथील पूना बायो एनर्जी प्रकल्प १४० टन क्षमतेने सुरू आहे. या प्रकल्पातही ३०० टनांपर्यंत प्रक्रिया करण्यात येईल. उर्वरीत जे प्रकल्प कमी क्षमतेने चालविण्यात येत आहेत त्यांची क्षमता वाढविण्यात येईल. येत्या आठवड्याभरात या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या शिल्लक राहाणार्‍या ३०० टनांहून अधिक कचर्‍याची विल्हेवाट लावून शहरातील अतिरिक्त कचर्‍याचा प्रश्‍न मिटविण्यात येईल, असा दावा आयुक्त राम यांनी केला आहे.

You may have missed