Pune Satara Highway | पुणे-सातारा प्रवास आता एका तासात? महामार्गावर पाच-सहा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन
पुणे : Pune Satara Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण उपाययोजनांना गती दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच खंबाटकी घाट आणि पुण्यातील नवले पूल परिसराची पाहणी करून वाहतूक समस्यांचा आढावा घेतला.
या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पाच ते सहा ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच इतर आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असून, या प्रकल्पांमुळे पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होऊ शकतो. यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.
महामार्गावरील वाढती वाहनसंख्या, जड वाहतूक आणि सततची कोंडी यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाया जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बहुपदरी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे.
खंडाळा, शिरवळ आणि इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणी स्वतंत्र उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. त्यामुळे गावालगत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. औद्योगिक आणि मालवाहतूक वाहनांमुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, पुणे-सातारा वेस्टर्न बायपास प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा डीपीआर प्रस्तावित आहे. सुमारे 140 किलोमीटरच्या नव्या मार्गाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या मार्गामुळे जड वाहतूक बाहेरून वळवण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता सुहास घंटे यांनी सांगितले की, “सातारा-पुणे महामार्गावरील ब्लॅक स्पॉट काढण्यात येणार आहेत. आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल आणि इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डीपीआर करण्याचे काम प्रस्तावित असून, काम पूर्ण झाल्यानंतर सातारा ते पुणे अंतर एका तासात पूर्ण होऊ शकते.”
