DRI Pune News | पुणे रेल्वे स्थानकाजवळ वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश; दुर्मिळ प्रजातींसह दोघांना घेतले ताब्यात

DRI Pune News | DRI Pune of Mumbai Zonal Unit seizes prohibited wildlife species near Pune Railway Station; 2 persons apprehended

पुणे : DRI Pune News |  महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकाजवळ मोठी कारवाई करत प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींच्या बेकायदेशीर तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून दुर्मिळ वन्यजीव जिवंत अवस्थेत जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, DRI च्या अधिकाऱ्यांनी २० मे रोजी संशयितांवर पाळत ठेवून कारवाई केली. पहिल्या संशयिताला अडवून तपासणी केली असता दोन कागदी बॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या तीन जिवंत मलबार जायंट स्क्विरल (शेकरू) आढळून आल्या.

यानंतरच्या चौकशीत दुसऱ्या ठिकाणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सात जिवंत इंडियन स्टार कासव जप्त करण्यात आले.

मलबार जायंट स्क्विरल (Ratufa indica) आणि इंडियन स्टार टॉर्टॉईज (Geochelone elegans) या दोन्ही प्रजातींचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अनुसूची-१ मध्ये करण्यात आला आहे. या प्रजातींना सर्वोच्च संरक्षण देण्यात आले असून त्यांची शिकार, बाळगणे, वाहतूक किंवा व्यापार करण्यास कायद्याने बंदी आहे.

जप्त करण्यात आलेले वन्यजीव, संशयित आरोपी आणि जप्तीतील साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

DRI कडून वन्यजीव तस्करी आणि शिकारीविरोधात गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया सुरू असून पर्यावरण संरक्षणासाठी अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

You may have missed