ST Bus | एसटी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे होणार मोफत; वर्धापन दिनानिमित्त महामंडळाचा मोठा निर्णय
मुंबई : ST Bus | महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आजपासून (१ जून) राज्यातील लाखो एसटी प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, राज्यातील सर्वच एसटी बसस्थानके आणि आगारांमधील स्वच्छतागृहांची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.
यापूर्वी स्वच्छतागृहांच्या वापरासाठी प्रवाशांकडून २ ते १० रुपये आकारले जात होते, मात्र आता ही सशुल्क व्यवस्था मोफत करून महामंडळाने प्रवाशांना वाढदिवसाची मोठी भेट दिली आहे. १ जून १९४८ रोजी पुण्यातून धावलेल्या पहिल्या ‘लालपरी’च्या आठवणीला उजाळा देत यंदा महामंडळाच्या या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त हा महत्त्वपूर्ण निर्णय लागू करण्यात आला आहे.
अनेक बसस्थानकांवर स्वच्छतागृहांचे पैसे घेऊनही कमालीची अस्वच्छता असणे, पाण्याच्या सुविधा नसणे आणि कंत्राटदारांकडून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महामंडळाने आता खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी ही व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून बस तिकिटाच्या माध्यमातून आधीच जो ‘स्वच्छता अधिभार’ वसूल केला जातो, त्याच निधीचा वापर करून महामंडळ स्वतः या स्वच्छतागृहांची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे. या नव्या नियमांतर्गत प्रत्येक बसस्थानकावर दर चार तासांनी स्वच्छता करणे कंत्राटदार आणि प्रशासनाला बंधनकारक असणार आहे.
स्वच्छतागृहांव्यतिरिक्त बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी महामंडळाने आणखी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील प्रमुख डेपोंमध्ये मोफत आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची अवस्था सुधारून तिथे अधिक सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. एसटीचा प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायी करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ८,००० नवीन बसेस सामील केल्या जाणार आहेत.
