Gold-Silver Price Today | दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत 3210 रुपयांची मोठी वाढ, तर चांदी 1230 रुपयांनी झाली स्वस्त
पुणे : Gold-Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सध्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा रॉकेट गती घेतली असून, गेल्या सलग तीन दिवसांपासून यामध्ये वाढ होत आहे. आज सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात २६० रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे अवघ्या दोन दिवसांत १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत तब्बल ३,२१० रुपयांनी महागली आहे. मागील एका महिन्यात सोन्याच्या दरात ५.२ टक्के इतकी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
दुसरीकडे, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. जागतिक बाजारात औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला असणारी मागणी अनिश्चित असल्याने चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. आज चांदीच्या दरात ७५० रुपयांची मोठी घसरण झाली, ज्यामुळे गेल्या दोन दिवसांत चांदी एकूण १,२३० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
भारतातील सोन्याच्या बहुतांश खाणी बंद असल्याने देशात लागणारे जवळजवळ सर्वच सोने परदेशातून आयात करावे लागते. भारत दरवर्षी सुमारे ८०० ते ८५० टन सोन्याची आयात करतो. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि तेल खरेदी करण्यासाठी भारताचा परकीय परकीय चलनाचा साठा वेगाने खर्च होत आहे. या परकीय चलनाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले आहे, ज्यामुळे जगाच्या तुलनेत भारतात सोन्याचे दर अधिक वाढलेले पाहायला मिळत आहेत.
