Pune Rural Police | विषारी दारू प्रकरणाचे पडसाद; मुख्य आरोपीशी संपर्क आढळल्याने पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार कर्मचारी निलंबित
पुणे : Pune Rural Police | पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेल्या गाजलेल्या प्रकरणाचे पडसाद आता पुणे ग्रामीण पोलिस दलात उमटू लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी संपर्क असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सोमवारी याबाबतचा आदेश जारी केला. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित शिवाजी काळे (Ajit Shivaji Kale), पोलीस शिपाई सुमित नंदकुमार वाघ (Sumit Nandkumar Wagh), यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप (Ramdas Gyandev Jagtap) तसेच दौंड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार सुभाष बलभीम डोईफोडे (Subhash Balbhim Doifode) यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी या चारही कर्मचाऱ्यांचे संपर्क असल्याचे समोर आले. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलिस दलाच्या शिस्तीला बाधक आणि संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
चौकशी अहवालाच्या आधारे महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपिले) नियमांनुसार संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन निलंबन कालावधीत या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून दिवसातून दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे विषारी दारू प्रकरणातील तपासाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून, अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या घटकांविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. या प्रकरणात आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
