Pune Crime News | चारित्र्याचा संशयावरुन तरुणीचा गळा दाबून केला खुन; घराला कुलूप लावून गेला पळून, वास येऊ लागल्याने गुन्हा उघडकीस, वाघोली पोलिसांनी परभणीहून केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात असताना चारित्र्याच्या संशयावरून भांडणे झाल्यानंतर त्याने तरुणीचा गळा दाबून खुन केला. घराला कुलूप लावून तो पळून गेला. घरातून वास येऊ लागल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर कुजलला मृतदेह आढळला. पोलिसांनी खुनी तरुणाला परभणी येथून अटक केली आहे.

रिहाना खातून (वय २६, रा. शिवअस्मी बिल्डिंग, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. मेदिनापूर, पश्चिम बंगाल) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी रवी समीर वैराळ Ravi Sameer Vairal (वय २७, रा. परभणी) याला अटक केली आहे.

याबाबत रिहानाचे नातेवाईक इमरान राजेसाहेब बोदलेखान (वय ३१, रा. आदर्शनगर, लोहगाव) यांनी वाघोली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २८ ते ३१ मे दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी वैराळ हा प्लंबिंगचे काम करतो. तो व रिहाना खातून हे गेली दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये चर्‍होली येथे रहात होते. पण, रवी वैराळ याला रिहाना हिच्या चारित्र्याचा संशय येत होता. यावरुन त्यांच्यात भांडणे होत होती. चर्‍होलीहून ते १५ दिवसांपूर्वी वाघोली येथील शिवअस्मी बिल्डिंगमध्ये रहायला आले होते. गेले दोन तीन दिवस त्यांच्या घराला कुलूप होते. घरातून वास येऊ लागल्याने १ जून रोजी लोकांनी पोलिसांना ही बाब कळविली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आत तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी चौकशी केल्यावर रिहाना व रवी वैराळ हे लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात असल्याची माहिती मिळाली. रिहाना व रवी वैराळ यांचे मोबाईल बंद लागत होते. पोलिसांना तांत्रिक विश्लेषणातून रवी वैराळे हा परभणी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली.

त्याच्याकडे चौकशी केली असता, रिहाना हिच्या चारित्र्याविषयी रवी याला संशय होता. त्यातून त्यांच्यात भांडणे होत होती. ‘तु मला सोडून दे, नाहीतर मुलांना बोलावून तुला मारेन,’ अशी रिहाना त्याला धमकी देत होती. त्यातून त्याने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर घराला कुलूप लावून तो पळून गेला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.

You may have missed