Pune ACB Trap Case | नवीन वीज मीटर हवाय, प्रती मीटर हजार रुपये देण्याची ठेवा तयारी; महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक
पुणे : Pune ACB Trap Case | नवीन इमारत बांधली तर त्यातील सर्व घरांसाठी वीज मीटर आवश्यक असते. नवे वीज मीटर हवे असेल तर प्रती वीजमीटर किमान १ हजार रुपये वर देण्याची तयारी ठेवा. हो तसा महावितरणचा दरच ठरला आहे. हडपसर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. त्यातून महावितरणमधील दरपत्रक समोर आले आहे. (Pune Bribe Case)
अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र नारायण लोंढे Ramchandra Narayan Londhe (वय ४२, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.
तक्रारदार हे इलेक्ट्रिकल सब कॉन्ट्रॅक्टर असून ते महावितरणाची कामे करतात. महावितरणाचे उपविभाग २ हडपसरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या नवीन १२ वीज मीटर जोडणीच्या कामाचे १ हजार रुपये प्रति मीटर प्रमाणे तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांची मागणी केली. तसेच तक्रारदार यांना मिळालेल्या अन्य एका नवीन इमारतीच्या वीज कनेक्शनच्या कामाकरीता ५० हजार रुपयांची मागणी लोंढे करत असल्याची तक्रार त्यांनी २ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने २ जून रोजी पडताळणी कारवाई दरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे याने तक्रारदाराकडून बसविण्यात आलेल्या नवीन १२ वीज मीटर जोडणीचे प्रति मीटर १ हजार रुपये प्रमाणे १२ मीटरचे १२ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन त्यातील ४ हजार ५०० रुपये यापूर्वी घेतल्याचे कबुल केले. उर्वरित ७ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
या लाच मागणीच्या अनुषंगाने ४ जून रोजी दुपारी महावितरणच्या हडपसर उपविभागात लाच लचुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ७ हजार ५०० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन रामचंद्र लोंढे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही सापळा कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर तपास करीत आहेत.
