Pune Fire Case | गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत गंभीर भाजलेल्या तिघांचा दुदैवी मृत्यु; बाथरुममध्ये असल्याने सुन व गॅलरीत मुलगी असल्याने बचावले
पुणे : Pune Fire Case | गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा लावत असताना सिलेंडरमधून गॅस गळती होऊ लागली. तेव्हा तो सिलेंडर बाहेर नेत असतानाच आग लागून स्फोट झाल्याने त्यात गंभीर भाजलेल्या तिघांचा उपचार सुरु असताना ससून रुग्णालयात दुदैवी मृत्यु झाला. यावेळी मोठा स्फोट झाला व आग लागली. त्यात घरातील सर्व साहित्याचे तुकडे तुकडे झाले. फर्निचर आगीत जळाले. त्याचवेळी सुन बाथरुममध्ये आणि ५ वर्षाची मुलगी गॅलरीत असल्याने दोघी जणी बचावल्या आहेत. ही घटना खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीतील एका घरातील पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजता घडली.
विष्णु मुंजाजी गिते (वय ६०), पांडुरंग विष्णु गिते (वय ३५), वृंदावनी विष्णु गिते (वय ५५, सर्व रा़ खांदवेनगर, खराडी) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय ५ वर्षे) हे किरकोळ जखमी आहेत.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील खांदवेनगर मध्ये एक मजली बैठे घर आहे. तेथील पहिल्या मजल्यावरील स्वयपांकघरातील गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा सिलेंडर लावण्याचे काम सुरु होते. त्यावेळी सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. सिलेंडरला आग लागली. हे पाहून पांडुरंग यांनी सिलेंडर उचलून तो गॅलरीतून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी घरात पसरलेल्या गॅसचा स्फोटासारखा मोठा आवाज होऊन आग लागली. त्यात स्वयंपाकगृहात असलेले हे तिघे गंभीर भाजले.
अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यावर खराडी, येरवडा, धानोरी येथील गाड्या रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आग विझविली. जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना दुपारी त्यांचा मृत्यु झाला.
या आगीत फर्निचर, टिव्ही, वायरिंग पूर्णपणे जळाले. स्वयंपाकगृहातील फ्रिज, फर्निचर काही प्रमाणात झळा लागल्या. बाथरुम, टॉयलेटचे दरवाजे, गिझर जळाले होते. हॉलमधील सिलिंग पूर्णपणे जळून गेले. आगीमुळे सर्व भिंती काळ्या झाल्या होत्या. एकाच कुटुंबातील कर्त्या पुरुषासह तिघांचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
