Pune Crime News | वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या संस्थाचालकास येरवडा पोलिसांनी केली अटक;  बनावट अ‍ॅडमिशन लेटरने राज्यभरातील 40 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केले वाया

Pune Crime News | Yerwada Police arrest institute operator who swindled lakhs of rupees by promising admission to medical courses; 40 students across the state lost an academic year due to fake admission letters.

पुणे : Pune Crime News |  वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील ४० हून अधिक पालकांना लाखो रुपयांना गंडा घालून विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक वर्ष वाया घालविणार्‍या तेलंगणाच्या संस्थाचालकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

अरविंद प्रकाशकुमार आरोगोंडा Arvind Prakashkumar Aarogonda (वय ४७, रा. सिंकदराबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीविरुद्ध  हैद्राबाद येथे ३ आणि मुंबईत ३ असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. अरविंद आरोगोंडा याने या कामासाठी पालकांना गाठून देण्यासाठी पुणे, मुंबई, हैद्राबाद येथे एजंट नेमले होते. पुण्यात नेमलेला एजंटही हैद्राबाद येथील असून त्याला मराठी बोलता येत होते. त्यामुळे तो स्थानिक लोकांशी संपर्क साधू शकेल, या उद्देशाने त्याला एजंट म्हणून नेमले होते. हा प्रकार समजल्यावर तोही फरार झाला आहे.

आरोपी आणि त्याचा साथीदाराने एडव्हिओ लर्निंग सोल्यूशन्स प्रा. लि. नावाची कंपनी हैद्राबादमध्ये सुरू केली होती. या कंपनीच्या पुणे, मुंबईत शाखा सुरू केल्या होत्या. विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याची जाहिरात त्याने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मार्गदर्शनासाठी ५ लाख रुपये, खासगी महाविद्यालयात प्रवेशासाठी तीन लाख रुपये असे शुल्क तो आकारत होता. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश न मिळाल्यास पैसे परत करु, असे आमिष त्याने दाखविले होते. आतापर्यंत त्याने ४० विद्यार्थी, तसेच पालकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका पालकांची अरविंद आरोगोंडा याने आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी १८ मार्च रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला हैद्राबाद पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आरोपीला घेऊन मुंबईतील गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्याची आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याला येरवडा पोलिसांनी तपासासाठी  आर्थर  रोड कारागृहातून ताब्यात घेतले. पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड तपास करीत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के यांनी केली.

You may have missed