Lakhan More | दक्षिण आशियाई सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय; पाकिस्तानचा ७-० ने धुव्वा

Lakhan More | India's historic victory in the South Asian Soft Hockey Championship; Pakistan routed 7-0.

महाराष्ट्राचा सुपुत्र लखन नंदकुमार मोरे याने भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद भूषवित संघाला यशाच्या शिखरावर नेले.

Lakhan More | नेपाळची राजधानी काठमांडू येथे १९ ते २२ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पुरुष संघाने ऐतिहासिक कामगिरी करत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राचा सुपुत्र लखन नंदकुमार मोरे याने भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद भूषवित संघाला यशाच्या शिखरावर नेले.

या स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या चार देशांचा सहभाग होता. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी सामन्यात तब्बल ७-० अशा फरकाने पराभव करून इतिहास रचला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. वेगवान खेळ आणि अचूक रणनीतीसमोर पाकिस्तानचा संघ पूर्णपणे निष्प्रभ ठरला आणि त्यांना एकही संधी मिळाली नाही.

भारतीय संघात पुण्यातील साहिल सपकाळ, अनिश परशुरामी, ऋषिकेश साळुस्कर, साहिल रेगे आणि अनिल पाटील या खेळाडूंनीही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे सॉफ्ट हॉकी या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ओळख मिळण्यास मदत होणार असून, देशातील खेळाडूंना नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.