Pune PMC News | आकांक्षा फौंडेशनला महापालिकेच्यावतीने पुढील तीन वर्षे अर्थसहाय्य करण्यात येणार; सभागृह नेता गणेश बीडकर यांची माहिती
पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या पाच शाळांतील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणार्या आकांक्षा फौंडेशन या संस्थेला पुढील तीन वर्षे शिक्षक व अन्य स्टाफच्या वेतनासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे २५ हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. या संस्थेच्या शाळांमधील सर्वच बाबींचे ऑडीट करून महपाालिकेच्या इतर शाळांतही याचपद्धतीने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अभ्यास करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण क्षेत्रातील समिती नेमण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आकांक्षा फौंडेशनच्या माध्यमातून महापालिकेच्या ५ शाळांमध्ये शिक्षण देण्यात येत आहे. २००७ मध्ये के.सी. ठाकरे या एकाच शाळेत सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणार्या या संस्थेकडे कालांतराने पाच शाळा सोपविण्यात आल्या आहेत. सध्या या शाळांमध्ये पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सीएसआर च्या माध्यमातून मिळणार्या निधीतून आकांक्षा फौंडेशनच्या माध्यमातून विषयानुरुप शिक्षक व अन्य स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून केवळ गणवेष व अन्य शालेय साहीत्य उपलब्ध करून देण्यात येते. आकांक्षा फौंडेशनने आतापर्यंत शिक्षक व स्टाफच्या वेतनावर सीएसआरच्या माध्यमातून १५० कोटी रुपये खर्च केले आहेत.
आकांक्षा फौंडेशन प्रत्येक विद्यार्थ्यामागे ५५ हजार रुपये खर्च करते. परंतू विद्यार्थी संख्या वाढली आणि तुलनेने सीएसआरची रक्कम कमी पडू लागल्याने संस्थेने महापालिकेकडे प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये मागणी केली आहे. महापालिका प्रति विद्यार्थी ३८ हजार रुपये खर्च करते. आकांक्षा फौंडेशनच्या शाळांचा दहावीचा रिझल्ट ९८ टक्के असून येथे शिक्षण घेतल्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांची संख्या देखिल ८९ टक्के आहे. तर महापालिकेच्या अन्य शाळांमधील दहावीचा रिझल्ट देखिल अत्यंत कमी असून जेमतेम ३० टक्के विद्यार्थीच पदवीचे शिक्षण पूर्ण करतात. गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आकांक्षा फाउंडेशनला पुढील तीन वर्षे अर्थसहाय्य करण्यात येईल. यानंतर त्यांच्या शिक्षणाचे व खर्चाचे ऑडीट करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. आकांक्षा फौंडेशनप्रमाणेच अन्य संस्था पुढे आल्यास त्यांचेही स्वागत करण्यात येईल, असेही बीडकर यांनी नमूद केले.
