Pune Crime News | एकाच सोसायटीतील भरदिवसा 3 फ्लॅट फोडून लाखो रुपयांची घरफोडी करणार्या टोळक्यापैकी एका चोरट्याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मुंबईहून केली अटक
पुणे : Pune Crime News | मांगडेवाडी येथील एकाच सोसायटीतील ३ फ्लॅट भर दिवसा फोडून घरातील रोकड, सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेणार्या चोरट्यांपैकी एकाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मुंबईहून जेरबंद केले.
फकरुद्दीन इमामुद्दीन शाह Fakhruddin Imamuddin Shah (वय ३९, रा. घाटकोपर, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याचे साथीदार फरार आहेत.
याबाबत सराफ प्रविण प्रताप सावंत (वय ३७, रा. ओम रेसिडेन्सी, पुनम पेट्रोल पंपाजवळ, मांगडेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे वेदिका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. २२ ऑगस्ट रोजी ते दुपारी दुकानात होते . त्यांची पत्नी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान दुकानात आल्या. त्या पुन्हा घरी गेल्या. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील सोन्याची चैन, टॉप्स, कानातील रिंगा, लॉकेट , चांदीचे पैंजण असा १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यांच्या शेजारील शिवालय सोसायटीतील दोन घरे फोडून चोरट्यांनी एकूण सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक करीत असताना पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे व प्रदिप राठोड यांना घटनास्थळ व आजु बाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी दरम्यान ४ चोरटे सिल्व्हर रंगाच्या वॅग्नर गाडीमधून घटनास्थळी येऊन घरफोडी करुन गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे व पोलीस अंमलदार अजित शिंदे यांना मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता घरफोडी करणारे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते सध्या मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरुन पोलीस पथक मुंबईला रवाना झाले. त्यांनी फकरुद्दीन शाह याला घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने हा गुन्हा इतर साथीदारांच्या सोबत मिळून गेल्याची कबुली दिली. त्याने साथीदारांसोबत रायगड, सिंधुदुर्ग व नाशिक परिसरात देखील घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार प्रदिप राठोड, रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, साधना पवार यांनी केली आहे.
