Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; आंबेगाव पोलिसांकडून तिघांना अटक, 5 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  पूर्ववैमनस्यातून दुचाकी लावून घरी परत जात असलेल्या तरुणावर टोळक्याने गोळीबार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आंबेगाव पोलिसांनी ५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे Shivdatta alias Sonya Harikaka Kondhre (वय २३, रा. दत्तलक्ष्मी निवास, दळवीनगर, आंबेगाव), श्रेयश रुपेश काटे Shreyash Rupesh Kate (वय २३, रा. वृंदावन हाईटस, धायरी फाटा), सुरज सुभाष डिंबळे Suraj Subhash Dimbale (वय २३, रा. कल्याण, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दगड्या ऊर्फ ऋतिक बेलदरे (Dagdya alias Hrithik Beldare) आणि आतिष ऊर्फ मन्या उमेश मोरे (Atish alias Manya Umesh More) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत रामदास माने (वय २१, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव) याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. याबाबत त्याची आई पोर्णिमा रामदास माने (वय ४३) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रेयश काटे हा नोकरी करत असून इतर सर्व जण शिक्षण घेत आहेत. मन्या मोरे, सोन्या कोंढरे आणि सुरज डिंबळे यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत माने व आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात यापूर्वी छोट्या मोठ्या कारणावरुन भांडणे झाली होती. चंद्रकांत माने हा ५ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो राहत असलेल्या आंबेगावातील हरणाई कॉम्प्लेक्समध्ये गाडीवरुन आला. गाडी पार्क करुन जिन्याने दुसर्‍या मजल्यावरील घरी जात होता. त्यावेळी गाडीवरुन आरोपी सोसायटीत आले. त्यांनी ‘‘चंद्या खाली ये आज तुला मारुन टाकतो’’ असे बोलून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील गावठी पिस्टलने चंद्रकांतच्या दिशेने गोळीबार करुन ते पळून गेले. सुदैवाने ही गोळी चंद्रकांत माने याला लागली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर आंबेगाव पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यापैकी तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed