Pune Crime News | दागिने घेऊन पैसे आणून देतो सांगत भामट्याने केला पोबारा; कोल्हापूरच्या सुवर्णकाराला पुण्यात पावणेपाच लाखांना घातला गंडा
पुणे : Pune Crime News | मित्राच्या ओळखीतून अडीच लाख आगाऊ पैसे देऊन दागिने बनवुन घेतले. पुण्यातील जे डब्ल्यु मेरियट हॉटेलमध्ये बोलावून दागिने घेऊन पैसे आणून देतो, असे सांगून भामटा पसार झाला. चतु:श्रृंगी पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
शुभम हवा पाटील Shubham Hawa Patil (वय ३०, रा. अॅस्पायर बिल्डिंग, अॅमनोरा टाऊनशिप, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत श्रेयांश बाळासाहेब सपाटे (वय ३०, रा. मानेनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शुभारंभ ज्वेलर्स या नावाने सोने चांदी खरेदी विक्रीचे दुकान बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे आहे.
पुण्यातील त्यांचा मित्र अभिराम काशीकर (रा. नांदेड सिटी) यांच्याकरवी त्यांची शुभम पाटील याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते सेनापती बापट रोडवरील जे डब्ल्यु मेरियट हॉटेलमध्ये भेटले. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुभम पाटील याने फोन करुन त्यांना सोन्याची चैन व अंगठी डिझाइनप्रमाणे बनवुन ६ तोळे वजनाचे दागिने पाहिजे असे सांगितले. त्याची किंमत साधारण ९ लाख ७९ हजार ८९० रुपये इतकी होईल, असे त्यांनी सांगितले. हा व्यवहार मान्य करुन त्याने ऑनलाईन अडीच लाख रुपये पाठवुन दिले.
२ मार्च रोजी त्यांनी नळस्टॉप येथे ४ लाख रुपयांची २५ ग्रॅमची सोन्याच्या ३ अंगठ्या शुभम पाटील याला आणून दिल्या. या वेळी अभिराम काशीकर हा बरोबर होता. त्यानंतर ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पावणे नऊ वाजता जे डब्ल्यु मेरियट हॉटेलमध्ये त्यांनी ५ लाख ७१ हजार रुपयांची सोन्याची चैन शुभम पाटील याला दिली. त्याने लगेच पैसे आणून देतो, असे सांगून तो दागिने घेऊन निघुन गेला. बराच वेळ ते हॉटेलमध्ये थांबुन राहिले. परंतु, शुभम पाटील हा आला नाही. त्याचा मोबाईलही बंद लागत होता. त्यानंतर त्याच्याशी ते व त्यांचे वडिल यांनी अनेकदा संपर्क साधला. तेव्हा त्याने आज देतो, उद्या देतो, असे सांगून उडवाउडवी उत्तरे दिली. परंतु आतापर्यंत त्याने ४ लाख ७९ हजार ८९० रुपये दिले नाही. शेवटी त्यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.
