Pune Crime News | गांजा तस्करीतील 6 महिन्यांपासून वाँटेड असलेल्या गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | पुण्यातील गांजा विक्रीमधील मुख्य सुत्रधार, चार गुन्ह्यातील वाँटेड आणि गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणार्या तस्कराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अजय पोपटराव पाडूळे Ajay Popatrao Padule (वय ३०, रा़ नवी म्हाडा कॉलनी, हडपसर) असे या तस्कराचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये चारुदत्त काळुराम चव्हाण, अजय पाडूळे यांच्याविरुद्ध ३५ किलो गांजा विक्रीकरीता जवळ बाळगल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी अजय पाडूळे हा गेल्या ६ महिन्यांपासून फरारी होता. पुण्यातील गांजा विक्री करणार्या व्यवसायाचा तो मुख्य सुत्रधार असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ याबरोबरच लोणी काळभोर व वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हे दाखल झाले आहेत. तो महाराष्ट्रातून परराज्यात पळून गेल्याचे सांगितले जात होते. भारती विद्यापीठ पोलीस त्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे यांना अजय पाडूळे हा आई व बहिणीला भेटण्यासाठी हडपसरमध्ये येणार असल्याचे समजले. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी हडपसरमधील पुरंदर चौक येथील नवी म्हाडा कॉलनी येथे सापळा रचून अजय पाडूळे याला ५ सप्टेंबर रोजी पकडले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे यांनी केली आहे.
