Baramati Crime News | गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून केला खून; माळेगांव पोलिसांनी अवघ्या 2 तासात नराधमाच्या आवळ्या मुसक्या
पुणे: Baramati Crime News | घरात एकट्या असलेल्या महिलेला पाहून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने कोणाला सांगू नये, म्हणून टॉवेलने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील पणदरे येथे घडली आहे. माळेगांव पोलिसांनी अवघ्या दोन तासात नराधमाच्या मुसक्या आवळल्या.
गणेश रामचंद्र माने Ganesh Ramchandra Mane (वय २६, रा. पणदरे) असे आरोपीचे नाव आहे. वैशाली तानाजी पवार (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत रंजना लक्ष्मण पवार (वय ५०) यांनी माळेगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा तानाजी व सून वैशाली पवार हे दोघे एम आय डी सी परिसरात वेगळे राहतात. तानाजी पवार हा बिगारी काम करतो. तो सकाळी कामाला जातो. रात्री घरी परत येतो. घरात वैशाली होती. तानाजी रात्री घरी आल्यावर पाहिले तर वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तो तेथेच रडत बसला. हे पाहून शेजारील लोकांनी फिर्यादी यांना फोन केला. माळेगांव पोलिसांनी वैशाली पवार हिचे शवविच्छेदन केले. त्यात ती गर्भवती असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी बारकाईने घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. त्यात गणेश माने याच्याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी गणेश माने याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, महिलेबरोबर शारीरिक संबंध करता यावे म्हणून अगोदर तिला हातोड्याने मारून जखमी केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी ती विरोध करत असताना तसेच तिने कोणाला सांगू नये म्हणून टॉवेलने गळा आवळून तिला मारून टाकले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
खून केल्यानंतर त्याने वैशाली हिच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व पायातील पैजण चोरले होते. पोलिसांनी हातोडा व चोरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अनिल ओमासे, संजय मोहिते, पोलिस हवालदार महेश पटारे, विजय वाघमोडे, अजय अवघडे, विष्णू गायकवाड, सोफिया शेख, पोलिस अंमलदार अमोल कोकरे, अजिंक्य कदम, श्रीकांत माने, न्यानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, विकास राखुंडे, जयसिंग कचरे, राजू शिंदे, सागर पवार, सुलतान डांगे यांनी केली आहे.
