Pune Crime News | जमिनीची मोजणी करण्यास मदत करतो असे सांगून एजंटने केली सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक
पुणे : Pune Crime News | उरुळी देवाची येथील शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी मदत करतो असे सांगून तलाठी कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्याने सेवानिवृत पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने पैसे परत मागताच त्याने जीव देण्याची धमकी दिली आहे.
याबाबत धर्मराज शंकर जाधव ( वय ६५, रा. संत तुकाराम नगर, मारुंजी, ता. मुळशी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राहुल उत्तम पठारे Rahul Uttam Pathare ( रा. होळकरवाडी, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ नोव्हेंबर २०२५ पासून घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धर्मराज जाधव हे पोलीस खात्यातून २०१९ मध्ये निवृत्त झाले. त्यांची उरुळी देवाची येथील औताडे हांडेवाडी गावच्या हद्दीत जमीन आहे. या गटाची पोट हिस्सा मोजणी करायची असल्याने ते उरुळी देवाची तलाठी कार्यालयात १४ नोव्हेंबर २०२५ ला गेले होते. तेथे काम करणाऱ्या राहुल पठारे याने त्यांना सांगितले की मी अनेक जणांची मोजणी करून दिली आहे. तुमची मोजणी करण्यास मदत करतो. त्याने अनेकांची नावे घेतली. तसेच काम केले नाही तर तुमचे पैसे परत करतो, असे सांगून एक कोरा चेक दिला. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून मोजणी कामासाठी वेळोवेळी एकूण ९१ हजार७१० रुपये दिले. त्यानंतर त्याने मामलेदार कचेरीत बोलावून अर्जाचे व चलनाचे अर्जावर सह्या घेतल्या.
२७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे लोक येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ते दुपारी दीड वाजता जागेवर जाऊन थांबले. कोणी लोक आले नाही म्हणून त्यांनी राहुल पठारे याला विचारले तर, त्याने लोक येवून गेले. तुम्ही उशिरा आला, स्थळ पाहणी करून गेले, असे सांगितले. त्यानंतर त्याने २९ नोव्हेंबर रोजी येणार असल्याचे सांगितले. त्या दिवशीही कोणी आले नाही. त्यामुळे त्यांनी मोजणी कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्या नावाचे कोणताही मोजणी अर्ज, चलन भरलेले दिसत नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी राहुल पठारेकडे चौकशी करून पैसे परत मागितले. तेव्हा त्याने वडिलांची जमीन विकून पैसे देतो, असे सांगितले. त्याने दोन चेक दिले. त्यांनी बँकेत भरल्यावर ते चेक बाऊन्स झाल्याने बँकेने फिर्यादी कडून २३६० रुपये दंड वसूल केला. फिर्यादी यांनी घरी जाऊन कागदपत्रे व पैशांची मागणी केली. त्यावर त्याने तुम्ही वारंवार माझ्या घरी येऊन नका. मला टेन्शन आले आहे. मी जीव देईन, अशी धमकी दिली. तसेच त्याने रागामध्ये त्यांच्या जमिनीवर लावलेल्या बोर्डाची तोडफोड करून नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.
