Pune Crime News | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कॉन्व्हॅयला कट करून दारूच्या नशेत जाणाऱ्या वाहनचालकावर गुन्हा दाखल
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कॉन्व्हाय जात असताना दारूच्या नशेत चालकाने वाहन वेडीवाकडी चालवून मोहोळ यांच्या वाहनास कट मारून जाण्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शुभम विजय वनीत Shubham Vijay Vaneet ( वय ३२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकांचे नाव आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले (वय ५०, रा.कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शिवाजीनगर येथील संचेती चौक येथे १३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम विजय वनीत हा कॅम्पमधील दुकानात कामाला आहे. फिर्यादी हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्यावर आहेत. मोहोळ यांचा कॉन्व्हाय विमानतळावरून शिवाजीनगरमार्गे कोथरूड कडे निवासस्थानी जात होता. त्यावेळी शुभम विजय वनीत हा दारू पिऊन भरधाव कार चालवत या कॉन्व्हाय मध्ये शिरला. संचेती चौकात त्याने पुढे जाण्यासाठी बेफिकीरपणे वाहन चालवून मोहोळ यांच्या वाहनाला कट करून पुढे निघून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी इशारा करून ही तो पुढे निघून जाण्यासाठी बेफिकीरपणे कॉन्व्हाय च्या मध्ये शिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी त्याच्यावर भा न्या संहिता २८१, सह मो वा का १८४, १८५, ११९ / १७७ खाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी शुभम वनित याला भा ना सु सा ३५(३) नुसार नोटीस दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक विकास काटे तपास करीत आहेत.
