Pune Festival | कीर्तन परंपरा युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज ! ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांचा पुणे फेस्टिव्हलतर्फे सन्मान (Video)
पुणे : Pune Festival | ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे यांच्या कीर्तन कलेतील योगदानाबद्दल पुणे फेस्टिव्हलतर्फे बुधवारी पुण्यातील पत्रकार भवन येथील सभागृहात ‘किर्तन रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी कीर्तन कलानिधी रामचंद्र भिडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पुणे फेस्टिव्हलचे विश्वस्त मोहन टिल्लू आणि ह. भ. प. निवेदिता मेहेंदळे मंचावर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. चारुदत्त आफळे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठा आधारस्तंभ म्हणून कृष्णकुमार गोयल यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांसमोर विविध दर्जेदार कार्यक्रम सादर होत आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत; मात्र २७ वर्षांनंतर पुण्याचा हक्काचा पुरस्कार मिळत असल्याचा विशेष आनंद आहे.’’
कीर्तन परंपरेशी युवा पिढीला जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘‘शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कीर्तनाचे प्रशिक्षण देण्याची योजना कीर्तनकारांची आहे. पुणे फेस्टिव्हलने यासाठी पुढाकार घेतल्यास समाजोपयोगी विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करता येईल. युवा पिढीच्या ऊर्जेला योग्य दिशा दिल्यास त्यातून उत्तम कार्य उभे राहू शकते. जेन झी पिढीबाबत केवळ भाष्य करण्यापेक्षा तिला समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
रामचंद्र भिडे म्हणाले, ‘‘पुणे फेस्टिव्हलची ३८ वर्षांची वाटचाल कौतुकास्पद आहे. डॉ. आफळे यांचे कीर्तनावरील प्रेम, जिद्द आणि देशप्रेम पाहता त्यांची सन्मानासाठी झालेली निवड योग्य आहे. कीर्तन प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिल्यास भविष्यात पुणे फेस्टिव्हलमध्ये तीन दिवसांचा कीर्तन महोत्सवही आयोजित करता येईल.’’
कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘‘कीर्तन ही समाजाला शिक्षण आणि संस्कार देणारी प्रभावी कला आहे. पुण्याला अध्यात्म आणि सांस्कृतिक क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभली आहे. ही परंपरा जपण्याचे काम पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू आहे. दिवंगत नेते सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेला पुणे फेस्टिव्हल आजही अखंडपणे सुरू आहे. डॉ. आफळे यांनी कीर्तनातून इतिहास, संस्कार आणि समाजाला जोडण्याचे काम केले आहे. कीर्तनाशी युवा पिढी जोडली जाणे आवश्यक आहे.’’
कार्यक्रमाची सुरुवात तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांच्या नांदीने झाली. त्यानंतर ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी श्री गणेश उपासना कीर्तनातून अष्टविनायकांपैकी पाली येथील बल्लाळ गणपतीची कथा सादर केली. त्यांना तबल्याला ओंकार जोशी आणि संवादिनीवर साहिल पुंडलिक यांनी वाद्यसाथ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी आभार मानले.
