Pune PMC News | स्टेशनरी खरेदीचा निर्णय पुन्हा बदलला; डीबीटीऐवजी प्रत्यक्ष साहित्य खरेदीचा प्रस्ताव; 2 कोटी 96 लाखांचा कार्यादेश देण्याची तयारी

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | पुणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी स्टेशनरी साहित्य खरेदीचा निर्णय अवघ्या काही दिवसांत पुन्हा बदलण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. स्थायी समितीने आधी जीईएम ( GeM) पोर्टलवरून खरेदीला मंजुरी दिल्यानंतर त्याच निर्णयाचा फेरविचार करून डीबीटीद्वारे रक्कम देण्यास मान्यता दिली होती. मात्र, ५३ प्रकारचे साहित्य हे वैयक्तिक कर्मचाऱ्यांसाठी नसून विभाग, दवाखाने, क्षेत्रीय कार्यालये आणि महापालिका शाळांच्या वापरासाठी असल्याने डीबीटी पद्धत व्यवहार्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रत्यक्ष साहित्य खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या विविध विभागांसाठी स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी जीईएम पोर्टलवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. समितीने ६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक ६९४नुसार हेमदीप एंटरप्रायझेस यांच्याकडून जीईएम पोर्टलच्या बी-२ कार्यपद्धतीनुसार सर्व करांसह २ कोटी ९६ लाख १२ हजार ५८९ रुपयांपर्यंत साहित्य खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. तसेच संबंधित ठेकेदारासोबत करारनामा करून देयके अदा करण्यासही मान्यता देण्यात आली होती.

स्थायी समितीच्या बैठकीत या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला. जीईएम पोर्टलवरून साहित्य खरेदी करण्याऐवजी डीबीटीद्वारे संबंधितांना रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने आता हा निर्णय व्यवहार्य नसल्याचे सांगत पुन्हा प्रत्यक्ष साहित्य खरेदीचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडून ५३ प्रकारच्या स्टेशनरी साहित्याची मागणी करण्यात आली आहे. या साहित्याचा वापर कार्यालयीन कामकाजासह दवाखाने, क्षेत्रीय कार्यालये आणि महापालिका शाळांमध्ये होतो. त्यामुळे ही खरेदी एखाद्या कर्मचाऱ्यापुरती मर्यादित नसून विभागनिहाय असल्याने डीबीटीच्या माध्यमातून साहित्याची गरज भागविणे शक्य नसल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. यापूर्वीही अशा प्रकारची खरेदी डीबीटी पद्धतीने करण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाचे स्पष्ट केले.

दरम्यान, स्थायी समितीच्या उपसूचनेत तीन महिन्यांसाठी आवश्यक तेवढे स्टेशनरी साहित्य खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. या कालावधीत खुल्या निविदा मागवून जीईएम  पोर्टलवरील दर आणि खुल्या निविदांमधील दरांची तुलना करावी आणि जो दर कमी असेल, त्यानुसार पुढील खरेदी करावी, असेही सुचविण्यात आले आहे.

त्यामुळे एकीकडे हेमदीप एंटरप्रायझेस यांना २ कोटी ९६ लाख रुपयांचा कार्यादेश देण्याची प्रशासनाची तयारी असताना, दुसरीकडे तीन महिन्यांचीच खरेदी करून त्यानंतर खुल्या निविदा काढण्याची उपसूचना करण्यात आली आहे.

You may have missed