Pune Festival 2026 | बालगंधर्व रंगमंदिरात ‘आशा-सुमन’ स्वरमैफल; आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या गीतांना स्वरांजली
पुणे : Pune Festival 2026 | पुणे फेस्टिवलअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ पुणे’ या सुगम संगीत स्पर्धेच्या 16 व्या वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात ‘आशा-सुमन’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गानसम्राज्ञी आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना समर्पित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या 15 वर्षांतील ‘व्हॉइस ऑफ पुणे’ स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे निवडक विजेते या विशेष कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. रात्री 9 ते 12 या वेळेत रंगलेल्या या स्वरमैफलीत आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या विविध लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाची संकल्पना अॅड. अनुराधा भारती यांची होती, तर कार्यक्रम समन्वयक म्हणून नितीन कुलकर्णी यांनी जबाबदारी सांभाळली.
टाळ्यांचा कडकडाट आणि ‘वन्स मोअर’ची दाद
कार्यक्रमात नितीन कुलकर्णी, उमेश पेडगावकर, अनिल दाभाडे, डॉ. अजय नित्तुरकर, सुब्रसमीर दास, किशोरी तांबोली, प्रीती वाटे, रुपलेखा हेगडे, प्रज्ञा खरात आणि डॉ. रोहिणी काळे यांनी आशा-सुमन यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.
एकापेक्षा एक सरस गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह उत्स्फूर्त दाद दिली. अनेक गीतांना प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर’चीही मागणी झाली.
लोकप्रिय गीतांनी रंगली संगीताची मैफल
कार्यक्रमात ‘अजहू ना आये बालमा’, ‘तुमसे वो हसीना’, ‘ना ना करते प्यार’, ‘ये बदलते रिश्ते’, ‘गरजता बरसता’, ‘तुमने पुकारा’, ‘आजकल तेरे मेरे प्यार’, ‘दीवाना हुआ बादल’, ‘गुनगुना रहे हैं’, ‘छोड़ दो आँचल’, ‘ये रातें ये मौसम’, ‘अभी ना जाओ छोड़ के’, ‘पिया पिया पिया’, ‘तू तू ही वही’, ‘ये लड़का हाय अल्लाह’, ‘जीवन के हर मोड़ पर’, ‘एक मैं एक और तू’, ‘लेकर हम दीवाना दिल’, ‘जाने जां’ आणि ‘आजा मैं हूँ प्यार तेरा’ यांसारखी लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या विशेष मेडलेमध्ये ‘रात बाकी’, ‘प्यार करने वाले’, ‘जवानी जानेमन’, ‘हुस्न के लाखों रंग’, ‘ये मेरा दिल’ आणि ‘पिया तू अब तो आजा’ या लोकप्रिय गीतांनी रसिकांना जुन्या हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.
दमदार वाद्यवृंदाची साथ
गायकांना वाद्यवृंदाची समर्थ साथ लाभली. की-बोर्डवर मिहिर भडकमकर आणि रशीद शेख, तबल्यावर रोहित पवार, तर ऑक्टापॅडवर ऋतुराज कोरे यांनी साथसंगत केली.
आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या सदाबहार गीतांचा वारसा नव्या पिढीतील कलाकारांच्या आवाजातून अनुभवण्याची संधी मिळाल्याने ही स्वरमैफल पुणे फेस्टिवलमधील संस्मरणीय कार्यक्रमांपैकी एक ठरली.
