Ganesh Visarjan Miravnuk 2026 | पुणे : विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या दोनच ढोल-ताशा पथकांना परवानगी; चौकात फक्त 10 मिनिटे स्थिर वादनास परवानगी राहणार

Ganesh Visarjan Procession 2026 | Pune: Only two dhol-tasha groups from each mandal allowed in the immersion procession; only 10 minutes of stationary playing allowed at the square

पुणे : Ganesh Visarjan Miravnuk 2026 |  गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळांना फक्त २ ढोल पथकांचा समावेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या ढोल ताशा पथकाला प्रत्येक चौकात फक्त १० मिनिटे स्थिर वादनास परवानगी दिली जाणार आहे. याबाबत प्रमुख चार विसर्जन मिरवणुक मार्गावर सहभागी होणार्‍या ६३८ गणेश मंडळे तसेच ढोल पथकांशी याबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्यातून सर्वांना पाळता येईल, असे नियम तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाचा उत्साह आता वाढत चालला असून बहुतांशी गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. जवळपास ३६ तास चालणार्‍या पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताची आखणी शहर पोलीस दलाने केली आहे. त्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे, मनोज पाटील,संजय पाटील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवरुन २६७ मंडळे, टिळक रोड २३१ मंडळे, केळकर रोडवरुन ७९ मंडळे आणि कुमठेकर रोडवरुन ५० गणेश मंडळे असे एकूण ६३८ गणेश मंडळे मुख्य चार विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. या विसर्जन मिरवणुकीसाठी १० हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्ताची आखणी पूर्ण झाली असून त्याची पाहणी गुरुवारी सायंकाळी करण्यात येणार आहे.

ध्वनी प्रदुषणावर बारकाईने लक्ष

गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये, दिलेल्या नियमामध्येच आवाजाची पातळी असावा, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे. ही मर्यादा ओलांडणार्‍या २४ मंडळांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून त्यांची साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत टोल, प्लाझमा, प्रेशर मिड, लेझर लाईट यांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळाची साऊंड सिस्टीम अगोदरच तपासण्यात येणार आहे.

गर्दीचे व्यवस्थापन हे सर्वात मोठे आव्हान

विसर्जन मिरवणुकीमध्ये होणारी गर्दी व तिचे व्यवस्थापन करणे हे सर्वात मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यादृष्टीने अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक ते मंडई या परिसरात कोठेही गडबड, गोंधळ होऊ नये, यादृष्टीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

क्राऊंड मॅनेजमेंटसाठी विशेष नियोजन केले असून सीसीटीव्ही कॅमेरे, एआय बेस कॅमेरे विसर्जन मिरवणुक मार्गावर तैनात करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे विसर्जन मिरवणुकीत होणार्‍या गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

विसर्जन मिरवणुकीत २ ढोल पथकांना परवागनी दिली असली तरी त्या पथकातील संख्येवर मर्यादा घालण्यात आली नाही. परंतु, ही ढोल पथके खूप मोठी नसावी, असे मंडळांना सांगण्यात आले आहे.

विसर्जन मिरवणुक किती तास चालली, यापेक्षा ही मिरवणुक शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडणे, याकडे पोलिसांचे सर्वाधिक लक्ष असणार आहे.

बेलबाग चौक ते अलका टॉकीज चौक दरम्यान मंडळांनी त्यांची मिरवणुक साडेतीन ते चार तासात पूर्ण करावी, अशी अपेक्षा आहे. पहिले मानाचे गणपती आपली मिरवणुक साधारण साडेतीन तासात पूर्ण करतात. यावेळीतील हे गणपती आपल्या वेळेत विसर्जन मिरवणुक पार पाडतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

महत्चाचे मुद्दे

* विसर्जन मिरवणुकीत १० हजार पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा बंदोबस्त
* कसबा गणपतीची मिरवणुक सकाळी साडेनऊ वाजता सुरु होणार
*चार मिरवणक मार्गावर ६३८ मंडळे सहभागी होणार
* गर्दीच्या व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन
* प्रत्येक मंडळात २ ढोल पथकांना परवानगी, सदस्यांवर मर्यादा नाही
* प्रत्येक चौकात फक्त १० मिनिटे स्थिर वादनास परवानगी
* वादनानंतर चौकातून पुढे जाण्यास ५ मिनिटांचा वेळ
* टोल, प्लाझ्मा, प्रेशर मिंड, लेझर लाईटला पूर्णपणे बंदी
* विसर्जन मिरवणुक किती तास चालली यापेक्षा सुरक्षित आणि सुनियोजनावर पोलिसांचा भर

You may have missed