Pune Festival 2026 | ‘द फोर सुपरस्टार’ने रंगली सुरेल मैफल ! देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
Pune Festival 2026 | ३८व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘द फोर सुपरस्टार’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या लोकप्रिय गीतांची सुरेल मैफल यावेळी सादर करण्यात आली. या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
‘जॉनी मेरा नाम’, ‘अगर तुम ना होते’, ‘ओ साथी रे’, ‘हम ने तुम को देखा’, ‘छुप गये सारे’, ‘तेरे चेहरे से नजर’, ‘बचना ऐ हसीनो’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘चला जाता हूँ’, ‘डफलीवाले’, ‘जीवन के हर मोड़’, ‘परदा है परदा’, ‘एक हसीना थी’, ‘प्यार हमें किस मोड़ पे’, ‘जय जय शिवशंकर’, ‘ओ मेरे राजा’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘मेरे सपनों की रानी’, ‘जिंदगी इक सफर’, ‘यारी है ईमान’, ‘डॉन’, ‘परदेसिया’, ‘दोस्ताना’ आदी लोकप्रिय गीत सादर करण्यात आले. या सदाबहार गीतांनी जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या आठवणींना उजाळा देत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमादरम्यान पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे, अतुल गोंजारी, सचिन आडेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख गायिका तेजस्विनी पाहुजा, हिम्मत पंड्या, चंद्रशेखर महामुनी आणि राधिका अत्रे यांनी विविध गीते सादर केली. अनिल करमरकर, अमन सय्यद, आसिफ खान, नंदु डेव्हिड, हर्षद गणबोटे, शाम चंदन आणि स्वयम् सोनवणे यांनी वाद्यसाथ केली. वाद्यवृंद संचलन व गिटार मुकेश देढिया यांनी केले, तर निवेदनाची जबाबदारी महेश गायकवाड यांनी सांभाळली.
