Pune Ganesh Visarjan Miravnuk | पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 33 तास 27 मिनिटे; 4,170 सार्वजनिक तर 6.24 लाख घरगुती गणपतींचे विसर्जन
कसबा गणपतीपासून सुरू झालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.10 वाजता संपली
पुणे : Pune Ganesh Visarjan Miravnuk | पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 33 तास 27 मिनिटे चालली. शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8.43 वाजता मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर सुरू झालेली मिरवणूक शनिवारी, 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.10 वाजता शांततेत पार पडली, अशी माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार पुणे शहरात विविध दिवसांमध्ये मिळून 4 हजार 170 सार्वजनिक गणपतींचे, तर तब्बल 6 लाख 24 हजार 685 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वाधिक 2 हजार 927 सार्वजनिक गणपती आणि 2 लाख 41 हजार 548 घरगुती गणपतींचे विसर्जन झाले.
मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला लागले 7 ते 9 तास
मानाचा पहिला कसबा गणपती शुक्रवारी सकाळी 8.43 वाजता मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. तो सायंकाळी 4.43 वाजता विसर्जन घाटावर पोहोचला. त्याची संपूर्ण मिरवणूक 8 तास चालली.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती याच्या मिरवणुकीला 7 तास 44 मिनिटे, तर मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती याच्या मिरवणुकीला 7 तास 26 मिनिटे लागली.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती याची मिरवणूक 8 तास 10 मिनिटे, तर मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती याची मिरवणूक 8 तास 46 मिनिटे चालली. सर्व मानाच्या गणपतींची मिरवणूक लक्ष्मी रोड मार्गे विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाली.
दगडूशेठ गणपतीची मिरवणूक 4 तास 9 मिनिटांत पूर्ण
पुण्यातील महत्त्वाच्या गणपती मंडळांपैकी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती शुक्रवारी सायंकाळी 4.18 वाजता मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. बेलबाग चौक आणि अलका चौकातून पुढे जात रात्री 8.27 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. या मिरवणुकीचा एकूण कालावधी 4 तास 9 मिनिटे नोंदवण्यात आला.
हुतात्मा बाबू गेणू मंडळाची मिरवणूक 7 तास 22 मिनिटे चालली. मंडळाचा गणपती 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.43 वाजता मार्गस्थ झाला आणि 26 सप्टेंबर रोजी रात्री 1.05 वाजता विसर्जन घाटावर पोहोचला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक 11 तास 8 मिनिटे
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. रात्री 9.31 वाजता बेलबाग चौकात आगमन झाल्यानंतर 9.57 वाजता तेथून मिरवणूक पुढे निघाली. शनिवारी पहाटे 2.50 वाजता अलका चौकात आगमन झाले आणि 3.15 वाजता रथ पुढे मार्गस्थ झाला.
सकाळी 4.08 वाजता मिरवणूक संपली. या गणपतीचे जागेवर विसर्जन करण्यात आले असून मिरवणुकीचा एकूण कालावधी 11 तास 8 मिनिटे इतका नोंदवण्यात आला.
त्याचप्रमाणे अखिल मंडई मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला 9 तास 29 मिनिटे, तर जिलब्या मारुती मंडळाच्या मिरवणुकीला 7 तास 10 मिनिटे लागली.
