Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन फसवणुक केल्याने तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त करणार्या विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | विवाहित असतानाही नात्यातील तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्याबरोबरच इतरांसोबत प्रेमसंबंध ठेवले. हे या तरुणाला समजल्यावर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांमधील चॅटवरुन हा प्रकार उघडकीस आला असून फुरसुंगी पोलिसांनी या विवाहितेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आदेश नितीन जगताप (वय २४, रा़. कुंभारवाडा, उरुळी देवाची) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई कल्पना नितीन जगताप (वय ४६) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका ३० वर्षाच्या विवाहितेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश जगताप हा शेती करुन एके ठिकाणी नोकरी करीत होता. त्याच्या गावातील नातेवाईक असलेल्या विवाहितेने त्याला भुरळ पाडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. आदेश याच्याबरोबर प्रेमाचे नाटक करत असताना तिने इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. हे आदेश याला समजल्यावर त्याने तिला जाब विचारला. त्यावर तिने आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे मेसेज आदेशला पाठविले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर निराश झालेल्या आदेश याने साडीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. आदेश जगताप याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या मोबाईलमधील त्याचे व या विवाहितेचे मेसेज घराच्या नजरेत आले. त्यातून आदेश या विवाहितेच्या प्रेमात होता. तिने त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे मेसेज पाठविल्याचे त्यांच्या चॅट मधून दिसून आले. त्यानंतर आता त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव तपास करीत आहेत.
