Banks Open On Sunday | प्रस्तावित 3 दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (27 सप्टेंबर) बँका सुरू राहणार; सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-लिंक शाखा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास RBI ची मंजुरी
नवी दिल्ली : Banks Open On Sunday | प्रस्तावित तीन दिवसीय देशव्यापी बँक कर्मचारी संपामुळे ग्राहकांच्या बँकिंग सेवांवर दीर्घकाळ परिणाम होऊ नये, यासाठी रविवार, 27 सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत.
28 ते 30 सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित संप असून त्यापूर्वी 26 आणि 27 सप्टेंबर हे शनिवार-रविवारचे दिवस आहेत. त्यामुळे सलग अनेक दिवस शाखांमधील बँकिंग सेवा प्रभावित होऊ नयेत, यासाठी 27 सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 27 सप्टेंबर रोजी सर्व संबंधित बँक शाखा, कार्यालये, एटीएम-लिंक शाखा आणि करन्सी चेस्ट पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप प्रस्तावित आहे. सरकार आणि बँक व्यवस्थापनाने संघटनांना संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.
त्यामुळे शाखेशी संबंधित महत्त्वाची कामे असलेल्या ग्राहकांना 27 सप्टेंबर हा अतिरिक्त कार्यदिवस उपलब्ध होणार आहे. यूपीआय, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा देखील उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे.
