Pune Crime News | पुणे : मार्केटयार्डमधील व्यापार्याला सॅलसबरी पार्क परिसरात भरदिवसा हल्ला करुन लुटण्याचा प्रयत्न; व्यापारी गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | मार्केटयार्डवरुन दुचाकीवर घरी जात असताना पाठीमागून आलेल्या तिघा चोरट्यांनी व्यापार्यावर धारदार हत्याराने वार करुन त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावुन नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अॅडव्हान्टिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून बरगडीवर खोलवर जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये सॅलसबरी पार्कमध्ये झालेल्या या हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत सॅलसबरी पार्क परिसरात राहणारे ५८ वर्षीय व्यापारी जखमी झाले आहेत. ही घटना सॅलसबरी पार्क येथे बुधवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यापाऱ्याचे मार्केटयार्डमध्ये बॅटरीचे दुकान आहे. ते एका बॅगेत सुमारे ५ लाख रुपये घेऊन दुचाकीवरुन घरी निघाले होते. मार्केटयार्डवरुन ते सॅलसबरी पार्क येथील घराजवळ आले असताना पाठीमागून एका दुचाकीवर तिघे जण आले. त्यांनी व्यापाऱ्याच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी घालून त्यांना थांबविले. त्यांच्यातील एकाने बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने त्यांना प्रतिकार करत बॅग धरुन ठेवली. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या पाठीवर, बरगडीवर कोयत्याने सपासप वार केले. जखमी होऊन ते खाली पडले. परंतु, त्यांनी हातातील बॅग सोडली नाही. तेव्हा चोरटे तसेच पळून गेले. त्यानंतर जखमी व्यापाऱ्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले की, जखमी व्यापाऱ्याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या बरगडीवर मोठी जखम झाली असून त्याचे सिटी स्कॅन काढण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. व्यापाऱ्यावर हल्ला करणारे तिघे जण असून त्यांचा शोध सुरु केला आहे.
