Pune Crime News | लैंगिक अत्याचार झाल्याने 21 वर्षाच्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; समर्थ पोलिसांनी नराधमाला केली अटक
पुणे : Pune Crime News | बी एम फार्मसीचे प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे गावाहून घेऊन येत असताना एस टी प्रवासात नराधमाने तरुणीला धमकावुन तिला हॉटेलवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे तणावातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थ पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
अविनाश वसंता निमरड Avinash Vasanta Nimrad (वय २६, रा. कोसरसार जि. चंद्रपूर) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत सोनाली हिच्या वडिलांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सोनाली (वय २१) हिचे बी फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाले असल्याने ती गावाकडील अकलुज या ठिकाणी तिचे एम फार्मसीचा प्रवेश घ्यायचा होता. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आणण्यासाठी ती गेली होती. २४ जुलै २०२६ रोजी ती गावाकडून सर्व कागदपत्रे घेऊन पुण्याकडे येत होती. इंदापूर येथून ती पुण्याला येणार्या बसमध्ये बसली. तिच्या शेजारी अविनाश निमरड हा बसला. त्याने सोनाली हिला तिचे वडील व भावाला मारण्याची धमकी दिली. स्वारगेटला एस टी बस आली आल्यावर तिला धमकावुन नाना पेठेतील हॉटेल पराग येथे नेले. तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे सोनाली हिला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिला काही दिवस भावासोबत मांजरी येथे काकाकडे राहण्यास पाठविण्यात आले होते. ३१ जुलै रोजी सकाळी घरातील सर्व जण आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. सोनाली हिची काकी गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. सोनाली एकटीच घरात होती. काकी सकाळी साडेनऊ वाजता मॉर्निंग वॉकवरुन घरी आल्या. त्यांनी पाहिले तर सोनाली हिने बेडशीट च्या सहाय्याने फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. तिला तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार व धार्मिक कार्य केल्यानंतर आता तिच्या वडिलांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी सांगितले की, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश निमरड याला अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
