Pune Crime News | पुणे : डॉक्टरला घरात घुसून मारहाण करत 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप; ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध गुन्हा

Pune Crime News | Pune: Allegation of demanding 5 lakh rupees while assaulting a doctor at home; case filed against 'Bigg Boss Marathi' fame Divya Shinde

पुणे : Pune Crime News | बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा तसेच पैसे न दिल्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे आणि तिच्या साथीदारांवर करण्यात आला आहे.

या प्रकरणी दिव्या शिंदे Reel Star Divya Shinde (रा. सनसिटी, सिंहगड रस्ता), आण्णा ढमढेरे (रा. पिंपरी) यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कलम ३०८(४), ३३३, १०९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० आणि ३२४(४) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड (वय ६५) हे २०२१ मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले. ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेतर्फे १ ते ३ सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.

तक्रारीनुसार, या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला डॉ. गायकवाड किंवा संस्थेकडून कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते. तसेच कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याबाबतही तिच्याशी कोणताही अधिकृत करार करण्यात आला नव्हता. मात्र, कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचा दावा करत ऑगस्ट महिन्यापासून डॉ. गायकवाड यांच्याकडे फोन आणि संदेशाद्वारे पाच लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घरी जाऊन दमदाटी केल्याचा आरोप

१७ सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि अन्य काही जण डॉ. गायकवाड यांच्या घरी गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या वेळी गायकवाड घरी नसल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करून संबंधित जण निघून गेल्याचा आरोप आहे.

त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी ढमढेरे याने डॉ. गायकवाड यांना फोन करून एका हॉटेलमध्ये बोलावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तेथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

२४ सप्टेंबरच्या रात्री हल्ल्याचा आरोप

तक्रारीनुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे त्यांच्या घरी आला. दरवाजा उघडल्यानंतर दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसल्याचा आरोप आहे.

यानंतर डॉ. गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच पैसे न दिल्याबद्दल त्यांना धमकावण्यात आले आणि मारहाण करण्यासाठी इतरांना चिथावणी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

डॉ. गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचे सांगून मारहाण थांबविण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर एका व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. तसेच दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्यानेही मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे.

गायकवाड यांच्या पत्नीबाबतही गंभीर धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कार घेऊन गेल्याचा आरोप

काही वेळाने डॉ. गायकवाड यांचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाच लाख रुपये न दिल्यास कार घेऊन जाण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर गायकवाड यांची कार घेऊन संबंधित आरोपी निघून गेल्याचा आरोप आहे.

घटनेदरम्यान घरातील काही साहित्याची तोडफोड करण्यात आल्याचेही पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

डॉ. गायकवाड यांचे म्हणणे

“कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता. मी केवळ संस्थेचा सदस्य आहे. मला पक्षाघात झाला असून माझी प्रकृतीही ठीक नाही. कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी दिव्या शिंदे हिला कोणीही सांगितले नव्हते किंवा कोणतेही अधिकृत आमंत्रण दिले नव्हते. तरीही माझ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली.”

– डॉ. विद्याधर गायकवाड, माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

You may have missed