Vidyanand Bapat News | पुणे : ‘सार्वजनिक ठिकाणी  लाऊडस्पिकरांवर 24 तास बंदी हवी’; विद्यानंद बापटांची ठाम मागणी

Vidyanand Bapat News | Pune: ‘There should be a 24-hour ban on loudspeakers in public places’; Vidyanand Bapat’s firm demand.

पुणे : Vidyanand Bapat News | ध्वनिप्रदूषणाविरोधात सातत्याने भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धकांवर 24 तास बंदी असावी, अशी ठाम मागणी केली आहे. ही बंदी केवळ रात्री 12 ते पहाटे 6 या वेळेपुरती मर्यादित न ठेवता दिवसभर लागू असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

रविवारी आयोजित ‘आवाज शांततेचा’ या कार्यक्रमात बापट बोलत होते. सार्वजनिक सण-उत्सवाच्या नावाखाली खुल्या जागांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी देता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

“शांततेत जगणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. रात्री बारा ते पहाटे सहा एवढाच वेळ नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी 24 तास ध्वनिवर्धकांवर बंदी असली पाहिजे,” अशी भूमिका बापट यांनी मांडली.

पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विशेषतः सण-उत्सवांच्या काळात मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्याचे तार्किक समर्थन करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

लाऊडस्पीकर हा उत्सवांचा अविभाज्य भाग कधीच नव्हता, असे सांगत केवळ धर्म, प्रथा किंवा परंपरेच्या नावाखाली कोणतीही बाब कायम ठेवणे योग्य नसल्याचे बापट म्हणाले. नागरी समस्यांकडे वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मधुरजग फाउंडेशन, ब्राइट्स सोसायटी आणि विचारवेध यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते बापट यांचा सत्कार करण्यात आला. अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेते सुमित राघवन, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कुमार नागे यावेळी उपस्थित होते.

अमोल पालेकर यांनी ध्वनिप्रदूषण आणि सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात बापट यांनी सातत्याने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. अतिक्रमण, रस्त्यांची दुरवस्था आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी प्रश्नांविरोधात नागरिकांनी वैयक्तिक पातळीवरही आवाज उठवायला हवा, असे त्यांनी म्हटले.

सुमित राघवन यांनी संस्कृतीपेक्षा सुसंस्कृत असणे महत्त्वाचे असल्याचे सांगत, “विचारांची पातळी खालावली आहे आणि आवाजाची पातळी वाढली आहे,” असे मत व्यक्त केले.

You may have missed