Divya Sunil Shinde Arrest | पुणे : ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेला अटक; निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करून 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप, 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : Divya Sunil Shinde Arrest | ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि रिलस्टार दिव्या शिंदे हिने कार्यक्रमात निमंत्रण नसताना बालगंधर्व रंगमंदिरातील ‘कला आविष्कार महोत्सवात’ येऊन त्यात सहभाग घेतल्याबद्दल ५ लाख रुपयांची मागणी केली होती. कँट्रोंमेंट हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्याच्या घरात शिरुन त्यांना मारहाण करुन ५ लाखांची खंडणी मागून तोडफोड करणार्या रिलस्टार, ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे हिला काळेपडळ पोलिसांनी आज अटक केली आहे.
दिव्या सुनिल शिंदे Divya Sunil Shinde (वय २५, रा. सनसिटी, सिंहगड रोड) असे तिचे नाव आहे.
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात शिरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गंभीर जखमी करण्यात आले आहे. दिव्या शिंदे हिच्याबरोबरच अण्णा ढमढेरे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तिला आज अटक करुन न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींनी फिर्यादी यांना पॅरेलिसेस झाला असताना बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. दिव्या शिंदे हिच्याकडून माहिती घेऊन इतर आरोपींना अटक करायची आहे. तसेच या कार्यक्रमाचे पैसे देईपर्यंत तुमची कार आम्ही घेऊन जाणार आहोत, अशी नोट त्यांच्याकडून लिहून घेतली आहे. त्यासाठी आरोपीच्या हस्ताक्षराचा नमुना घ्यायचा आहे, यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. काळे पडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.
डॉ़ विद्याधर गायकवाड हे सदस्य असलेल्या करुणादिप संस्थेने १ ते ३ सप्टेंबर २०२६ रोजी बालगंर्धव रंगमंदिर येथे कला आविष्कार महोत्सव आयोजित केला होता. यावेळी दिव्या शिंदे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसताना त्यांनी सहभाग घेतला होता. डॉक्टरांनी किंवा संस्थेकडून दिव्या शिंदे यांना या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते. असे असताना दिव्या शिंदे हिने सहभाग घेतला. त्याचे ५ लाख रुपये द्या, अशी मागणी करुन तिने व तिच्या ८ ते १० जणांनी डॉक्टरांच्या घरात शिरुन तोडफोड करुन डॉक्टरांना मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे़
