Pune Crime News | पुणे : स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून 17 वर्षाच्या युवकाचा मृत्यु; तिघा ठेकेदारांवर गुन्हा दाखल, लोणीकंदमधील घटना
पुणे : Pune Crime News | स्टोन क्रेशरवर अल्पवयीन मुलाला कामाला ठेवून त्याला कोणतेही सुरक्षा साधने न पुरविल्याने स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला. लोणीकंद पोलिसांनी स्टोन क्रेशर ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय १७) असे मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. दिलीप संभाजी शिळीमकर Dilip Sambhaji Shilimkar (वय ४०, रा. साई श्रेया समृद्धी अपार्टमेंट, बावडी रोड, वाघोली), सत्यजित अशोक जना Satyajit Ashok Jana (वय ३५, रा. स्पंदन स्पर्श, बावडी रोड, वाघोली), अमित भगवान अकोलकर Amit Bhagwan Akolkar (रा. व्हीजन प्रिसा अपार्टमेंट, रावेत, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हवालदार अजित हरीभाऊ कुर्हे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना लोणीकंद येथील साई राम स्टोन क्रेशर मशीन येथे १२ सप्टेंबर रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी साई राम स्टोन क्रेशर मशीन ठेकेदारीवर चालविण्यास घेतले आहे. प्रिन्स विजयसिंग धुर्वे हा १७ वर्षाचा आहे, हे माहिती असताना त्याला स्टोन क्रेशर मशीनवर कामावर ठेवले आहे. बालकांना धोकादायक व्यवसाय करण्यास प्रतिबंध असताना त्याला कामावर ठेवले. त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने, जसे सुरक्षा हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टीनेट इत्यादी साधने उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे प्रिन्स धुर्वे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे तपास करीत आहेत.
