Nasrapur Pune News | पुणे: नसरापूरजवळ दीडघर येथे कौलांच्या ढिगाऱ्यात सापडला 9 फुटी अजगर
पुणे : Nasrapur Pune News | नसरापूरजवळील दीडघर (ता. भोर) येथे डॉ. विराज सूर्यवंशी यांच्या फार्महाऊसच्या आवारात सुमारे नऊ ते दहा फूट लांबीचा अजगर आढळल्याने काही काळ खळबळ उडाली. फार्महाऊसमध्ये रचून ठेवलेल्या कौलांच्या ढिगाऱ्याखाली अजगर शिरताना एका कामगाराने पाहिले आणि तत्काळ डॉ. सूर्यवंशी यांना माहिती दिली.
यानंतर डॉ. सूर्यवंशी यांनी पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळाचा फोटो पाठवला. फोटोवरून तो अजगर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विभुते हे सर्परक्षक विलास धोंगडे, श्रीकांत खेडकर आणि सायली वालगुडे यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.
अजगर कौलांच्या अरुंद ढिगाऱ्यात अडकला असल्याने बचावकार्य अत्यंत सावधपणे करण्यात आले. एकेक कौल बाजूला करताना अजगराला कोणतीही इजा होऊ नये तसेच कौले कोसळू नयेत, याची काळजी पथकाने घेतली. अखेर अजगराला सुरक्षितपणे बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, भोर आणि राजगड परिसरात भारतीय अजगराचे दर्शन आता तुलनेने दुर्मिळ होत आहे. वाढते अतिक्रमण, जंगलतोड आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे या प्रजातीच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.
अलीकडे आढळलेला हा अजगर वरच्या जंगलातील बिळात पाणी शिरल्याने नदी-नाल्यांच्या प्रवाहातून मानवी वस्तीजवळ पोहोचला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
