Pune PMC News | पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गा’चे (HCMTR) काम 4 टप्प्यांत; पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा नोव्हेंबरमध्ये काढण्याची तयारी

Pune PMC News | Pune: Work on the proposed 'High Capacity Mass Transit Route' (HCMTR)—aimed at easing traffic congestion in the city—to be executed in four phases; preparations underway to float tenders for the first two phases in November.

पुणे : Pune PMC News | शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गाचे (HCMTR) काम चार टप्प्यांत अर्थात पॅकेजेसमध्ये केले जाणार आहे. यापैकी सिंहगड रस्ता ते लुल्लानगर आणि विमाननगर ते बॉम्बे सॅपर्स या पहिल्या दोन टप्प्यांच्या निविदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढण्याचा पुणे महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबत माहिती दिली. या दोन्ही टप्प्यांमध्ये तुलनेने कमी भूसंपादन करावे लागणार असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

सन 1987 च्या विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेला HCMTR प्रकल्प पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रस्तावित उन्नत मार्ग सुमारे 36 किलोमीटर लांबीचा आणि 24 मीटर रुंदीचा असून, या मार्गावर 34 प्रमुख चौक तसेच प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी 33 रॅम्प प्रस्तावित आहेत.

प्रकल्प आराखड्यानुसार सुमारे 21.8 किलोमीटरचा मार्ग विद्यमान रस्त्यांवरून जाणार आहे. सुमारे 4.28 किलोमीटर मार्ग नाले, नदी आणि कालव्यालगत, तर 4.34 किलोमीटर मार्ग वनक्षेत्र आणि रेल्वे परिसरातून जाणार आहे. याशिवाय काही भाग बांधकामे आणि झोपडपट्टी परिसरातून जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.

प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जमिनीबरोबरच काही खासगी जागांचेही संपादन करावे लागणार आहे. मात्र, या प्रकल्पातील मोठा भाग विद्यमान 24 मीटर रुंदीच्या रस्त्यांवरून जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

HCMTR प्रकल्प येत्या तीन वर्षांत मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून, आवश्यक भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून विशेष सहकार्य मिळेल, असे गणेश बीडकर यांनी सांगितले.

पहिला टप्पा: सिंहगड रस्ता ते लुल्लानगर

उन्नत पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या HCMTR चा पहिला टप्पा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानापासून सुरू होईल. तेथून हा मार्ग स्वारगेट आणि पुढे बिबवेवाडीमार्गे लुल्लानगरपर्यंत जाणार आहे.

पु. ल. देशपांडे उद्यानापासून कॅनॉल रस्त्याने सारसबाग, पुढे व्होल्गा चौक, सातारा रस्ता, पुष्प मंगल कार्यालय, बिबवेवाडी, केंजळेनगर आणि गंगाधाममार्गे हा मार्ग लुल्लानगरपर्यंत पोहोचणार आहे.

सिंहगड रस्ता ते स्वारगेटदरम्यान मेट्रो प्रकल्पही असल्याने या भागात दुमजली उन्नत पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे.

दुसरा टप्पा: विमाननगर ते बॉम्बे सॅपर्स

HCMTR चा दुसरा टप्पा पुणे विमानतळाजवळील विमाननगर येथून सुरू होऊन 509 चौक, विश्रांतवाडी चौकमार्गे बॉम्बे सॅपर्सपर्यंत जाणार आहे.

पहिले दोन्ही टप्पे प्रत्येकी साधारण 10 ते 12 किलोमीटर लांबीचे असतील.

You may have missed