Pune Crime Court News | पुणे: जेलमध्ये असताना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात निलेश घायवळसह सर्व 6 आरोपी निर्दोष; पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय
पुणे: Pune Crime Court News | कारागृहात असताना खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या २०२० मधील एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादीने न्यायालयात मूळ तक्रारीपासून माघार घेतली, तर इतर साक्षीदारांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना समर्थन न दिल्याने हा निकाल देण्यात आला. (Pune gangster Nilesh Ghaiwal)
गुन्हे शाखेच्या आरोपानुसार, निलेश घायवळ दुसऱ्या एका गुन्ह्यात कारागृहात असताना त्याच्या सांगण्यावरून संतोष धुमाळ याने तक्रारदाराकडे ‘भावाच्या रॅलीसाठी जीप हवी आहे’ या कारणावरून खंडणी मागितली होती. या प्रकरणात घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Nilesh Ghaiwal)
मात्र, सुनावणीदरम्यान तक्रारदाराने पोलिसांनी दबाव टाकून तक्रार नोंदवून घेतल्याचा दावा केला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नोंदवलेल्या जबाबातही अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्याने सांगितले होते. खटल्यादरम्यान तक्रारदार, इतर साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनी सरकारी पक्षाच्या आरोपांना समर्थन दिले नाही.
त्यामुळे सबळ पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद करत न्यायालयाने निलेश घायवळ, संतोष धुमाळ, मुसा शेख, अक्षय गोगावले, कुणाल कंधारे आणि विपुल माझीरे यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग, ॲड. रितेश गदादे, ॲड. अनिश पाडेकर, ॲड. बिलाल मणियार आणि ॲड. सलमान पठाण यांनी बाजू मांडली.
दरम्यान, निलेश घायवळविरोधात इतर प्रकरणांमध्ये स्वतंत्र तपास आणि कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्याविरोधातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत स्वतंत्रपणे विचाराधीन आहेत.
